आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भ्रष्टाचाराविरोधात ‘आप’चा नाशिकमध्ये दिल्ली पॅटर्न

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- पोलिस तक्रार नोंदवण्यासाठी पैसे मागत असतील, टेबलखालून व्यवहार होईपर्यंत रेशनकार्ड मिळत नसेल तर सर्वसामान्य नागरिकांना लाचलुचपत खात्यामार्फत संबंधितास पकडून देणे यापुढे सहज शक्य होणार आहे. ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी नाशिक शहरासाठी एक हेल्पलाइन व 60 जणांचे भरारी पथकच कार्यान्वित केले असून, त्यांच्याशी संपर्क साधल्यावर भ्रष्ट कर्मचार्‍यास पकडून देण्यापासून तर न्यायालयीन लढाईपर्यंत सर्वच पायर्‍यांवर ‘आप’ची सोबत लाभणार आहे.

‘आप’चे नाशिक संयोजक जितेंद्र भावे, स्वप्नील घिया, जसबीरसिंग यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले की,

सरकार स्थापन झाल्यानंतर दिलेल्या आश्वासनानुसार भ्रष्टाचारमुक्तीसाठी हेल्पलाइन सुरू केली. सरकारी कामांसाठी सामान्यांचा खिसा कापला जात असून, त्यांच्याविरोधात दाद मागण्यासाठी मदत मिळत नाही. नाशिकमध्येही अशा तक्रारी आल्यामुळे लाचखोरांवर कारवाईसाठी ‘आप’ने अँक्शन प्लॅन तयार केला असून, हेल्पलाइन सुरू केली आहे.

प्रत्येक प्रभागासाठी एक भरारी पथक : 60 लोकांचे भरारी पथक कार्यान्वित केले जाणार असून, शहरातील सहाही प्रभागांत प्रत्येकी एक याप्रमाणे सहा पथके काम करतील. पथकात दहा व्यक्तींचा समावेश असेल. त्यात लाचखोरांच्या केसेस हाताळणारे वकील, माहिती अधिकार कार्यकर्ते, समाजसेवक, पत्रकार व तज्ज्ञांचाही समावेश असेल.

स्टिंगही करणार
काही ठिकाणी तक्रारदाराला तत्काळ लाचलुचपत खात्याशी संपर्क साधता येणार नाही. किंबहुना तितका वेळ नसेल तर ‘आप’शी संपर्क साधून स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातूनही प्रकाश टाकता येईल. गर्भलिंगनिदान चाचणीसारख्या अनधिकृत कारवायांना लगाम घालण्यासाठी ‘आप’मार्फत स्टिंग ऑपरेशनच्या मोहिमा राबवल्या जातील. जितेंद्र भावे, संयोजक, आम आदमी पार्टी

अशी आहे हेल्पलाइन
भ्रष्टाचार करणार्‍यांची माहिती देण्यासाठी समन्वयक म्हणून विलास देसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हेल्पलाइनच्या रूपाने 9823026131/9823209131 हे क्रमांक खुले करून देण्यात आले आहेत. या क्रमांकांवर फोन करून नागरिक कोठे भ्रष्टाचार होत आहे, संबंधित अधिकारी कोण, याची माहिती जाणून घेतील. त्यानुसार कसा ट्रॅप करायचा, याचे नियोजन केले जाईल. पैशांच्या देवाणघेवाणीच्या प्रत्येक टप्प्यात ‘आप’चे पथक तक्रारदारासोबत असेल.