आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aaras Compitetion In Nashik City Bye Divya Marathi Newspaper

‘दिव्य मराठी’तर्फे ‘आरास बाप्पांची’ उपक्रम; घरगुती तसेच मंडळायसाठी स्पर्धा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- लाडक्या गणपती बाप्पांचे सोमवारी आगमन होत असून, त्यांच्या स्वागतासाठी आबालवृद्ध सज्ज झाले आहेत. बाप्पांच्या या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे सार्वजनिक मंडळांकडून तयार करण्यात येणारी आकर्षक सजावटीची आरास. या पार्श्वभूमीवर ‘दिव्य मराठी’ आणि श्री संत गाडगे महाराज पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आरास बाप्पांची’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात सहाही विभागातील उत्कृष्ट आरास असलेल्या मंडळांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत.

उत्कृष्ट सजावटीसह उत्कृष्ट मूर्ती, उत्कृष्ट समाजप्रबोधनपर आणि पर्यावरणपूरक देखावा तसेच शिस्तबद्ध मिरवणूक या निकषांच्या आधारे स्पर्धा होईल. या विजेत्या मंडळांना विभागवार प्रत्येकी प्रथम तीन क्रमांकाचे व एक उत्तेजनार्थ अशी एकूण 24 पारितोषिके देण्यात येतील. त्यात पूर्व, पश्चिम, पंचवटी, सातपूर, सिडको आणि नाशिकरोड या भागांचा समावेश आहे. ही स्पर्धा नि:शुल्क असून, सहभागी होण्यासाठी खालील अर्ज भरणे बंधनकारक आहे. प्रत्येक सहभागींना प्रमाणपत्र देण्यात येतील. बक्षीस समारंभाची तारीख ‘दिव्य मराठी’मध्ये प्रसिद्ध करण्यात येईल. स्पर्धेत परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील व मंडळांचे देखावे पाहण्यासाठी परीक्षक कधीही देखावास्थळी भेट देतील. यासाठी मंडळाने दर्शनी भागात सहभागाचा बॅनर लावणे आवश्यक आहे. या स्पर्धेसाठी सोनगिराज मिहीर हर्बल्स आणि श्री राजे सामाजिक, सांस्कृतिक, कला व क्रीडा मंडळ यांचे सहकार्य लाभले असून, सहभागी होण्याचे आवाहन पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष शंकरराव बर्वे, उपाध्यक्ष श्यामसुंदर काबरे, अमोल बर्वे, हर्शल नाईक, महेंद्र सोनगिरा, प्रकल्प संयोजक हेमंत देवरे, गणेश बर्वे, मंगला काकड, रमेश पवार, राहुल बर्वे आदींनी केले आहे.

अर्ज जमा करण्याची मुदत
स्पर्धेत सहभागासाठी 9 ते 13 सप्टेंबरदरम्यान सकाळी 11 ते सायं. 5 या वेळेत अर्ज भरता येतील. त्यानंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद मंडळांनी घ्यावी. अधिक माहितीसाठी 0253-2500319 किंवा 975547616 वर संपर्क साधावा.

‘माझा गणपती बाप्पा सर्वात चांगला’
घरगुती गणपती आरास स्पर्धेचेही आयोजन
प्रतिनिधी
नाशिक- श्री गणरायाचे आज घरोघरी आगमन होत आहे. बाप्पांच्या या उत्सवासाठी आकर्षक सजावट करणार्‍या गणेशभक्तांसाठी ‘दिव्य मराठी’तर्फे 9 ते 18 सप्टेंबर या कालावधीत ‘माझा गणपती बाप्पा सर्वात चांगला’ ही घरगुती गणपती आरास स्पर्धा आयोजित केली आहे. ज्याद्वारे गणेशभक्तांना भरघोस बक्षिसे जिंकता येतील.

स्पर्धेदरम्यान उत्कृष्ट सजावट असलेल्या गणरायाची निवड करण्यात येईल व तो फोटो ‘दिव्य मराठी’मध्ये प्रकाशित करण्यात येईल. फोटो प्रकाशित झालेल्या स्पर्धकास 2500 रुपये किमतीची चांदीची फ्रेम स्पर्धेनंतर बक्षीस देण्यात येईल. तसेच, सहभागी झालेल्यांपैकी 31 विजेत्यांना उत्तेजनार्थ 1000 रुपये किमतीचे मिरजकर सराफ अँण्ड जेम्स प्रा. लि.चे गिफ्ट व्हाऊचर देण्यात येईल. स्पर्धेचे सर्व हक्क आयोजकांकडे राखीव असून, सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. बक्षिसांचे प्रायोजकत्व मिरजकर सराफ अँण्ड जेम्स प्रा. लि. यांनी स्वीकारले आहे.