आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयमा इंडेक्स’मध्ये 300 कोटींची उलाढाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- अंबड इंडस्ट्रीज अँण्ड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनच्या वतीने शहरात झालेल्या ‘आयमा इंडेक्स 2014’ या प्रदर्शनात चार दिवसांत 300 कोटी रुपयांच्या आसपास उलाढाल झाली. प्रदर्शनात सहभागी झालेल्या उद्योजकांकडे त्यांच्या उत्पादनासाठी मोठय़ा प्रमाणावर ‘एन्क्वायरी’ही आल्याने उलाढालीची ही प्रक्रिया दीर्घकाळ चालणार आहे. यातून आगामी पाच महिन्यांत किमान पाचशे कोटी रुपयांची उलाढाल होणे अपेक्षित आहे.

देशातील औद्योगिक क्षेत्र मंदीच्या दुष्टचक्रातून जात असल्याची पार्श्वभूमी असतानाही दोनशेवर स्टॉलधारकांचा सहभाग आणि चार दिवसांत सव्वा लाखावर लोकांनी या प्रदर्शनास भेट दिल्याने त्याची यशस्वीता स्पष्ट झाली आहे. हिंदुस्थान एरोनॉटिकल लिमिटेडकडून ‘इंडिनायजेशन’ या संकल्पनेद्वारे हजारो कोटींचा व्यवसाय भारतात आणण्यात येत आहे. भारतीय उद्योजकांकडून विमानबांधणी किंवा हेलिकॉप्टर बांधणीसाठीचे आवश्यक भाग उत्पादित करून घेतले जाणार आहेत. यासाठी आउटसोर्सिंग रजिस्ट्रेशन आणि व्हेंडर रजिस्ट्रेशन प्रक्रिया प्रदर्शनात राबवली गेली. 1500च्या आसपास व्हेंडर्सनी एचएएलकडून नोंदणी अर्ज नेले आहेत. याचा थेट फायदा स्थानिक उद्योगांना होणार असून, कोट्यवधींचे काम या उद्योगांना मिळणार असल्याचे प्रदर्शनाचे चेअरमन धनंजय बेळे यांनी सांगितले.

विक्री, बुकिंग अन् चौकशी
मंदी असतानाही प्रदर्शनात मरगळ जाणवली नाही. जागेवर विक्री तर झालीच, शिवाय पाच मशिन्स बुक झाले. चौकशीही मोठय़ा प्रमाणावर झाली. यामुळे पुढील वर्षभर व्यवसाय मिळणार आहे. राजेंद्र वडनेरे, चेअरमन, रॉयल इंक्स अँण्ड इक्विपमेंटस्

व्यवसाय मिळण्याची खात्री
सेंट्रिफ्युएल पंप्समध्ये नाशिकमध्ये आम्ही एकमेव उत्पादक आहोत. प्रदर्शनात 15 एन्क्वायरीज आल्या आणि त्यापैकी मंगळवारी दोन ऑर्डरही आल्या. अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला असून वर्षभर व्यवसाय मिळण्याची प्रक्रिया सुरू राहील. एन. डी. ठाकरे, व्यवस्थापकीय संचालक, इंडो पंप्स

अपेक्षेनुरूप प्रतिसाद
प्रदर्शनाच्या आयोजनामागील हेतू साध्य झाला. मंदीतही संधी उद्योजकांनी शोधली. खरेदी, विक्री व बुकिंग यामुळे निव्वळ व्यवसाय येथे झाला. 300 कोटींच्या आसपास प्रत्यक्ष उलाढाल झाली. सुरेश माळी, अध्यक्ष, आयमा