आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Abhilash Khandekar News In Marathi, State Editor Of Divya Marathi, Nashik

यशवंतरावांचे कार्य अभ्यासावे, अभिलाष खांडेकर यांचे प्रतिपादन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - दूरदृष्टिकोन आणि व्यासंगी व्यक्तिमत्त्व अशी ख्याती असलेल्या यशवंतराव चव्हाण यांनी राज्याला विधायक दिशा दाखविण्याचे काम केले खरे; पण आजच्या राजकारण्यांनी या कामाची तमा न बाळगता नैतिक मूल्यांचे अध:पतन केले आहे. त्यामुळेच महाराष्ट्र प्रगतीच्या बाबतीत मागे पडत आहे, अशी खंत ‘दिव्य मराठी’चे संपादक (महाराष्ट्र) अभिलाष खांडेकर यांनी व्यक्त केली. यशवंतरावांनी केलेल्या कामांचे अध्ययन आजच्या राजकारण्यांनी केल्यास मोठे सामाजिक बदल घडू शकतील, असेही त्यांनी नमूद केले.


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या नाशिक विभागातर्फे मंगळवारी अभिलाष खांडेकर यांचे ‘यशवंतराव चव्हाण आणि आजचा महाराष्ट्र’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. यशवंतराव चव्हाण यांच्या 101 व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला झालेल्या या कार्यक्रमात ते बोलत होते.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वनाधिपती विनायकदादा पाटील होते. 30 वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या यशवंतरावांचे आजही वेळोवेळी स्मरण होते ही बाबच त्यांच्या कार्याची पावती देते, असे सांगत खांडेकर पुढे म्हणाले की, यशवंतरावांनी मूल्यांवर आधारित असलेले राजकारण केले. तडजोड, गैरव्यवहार, भ्रष्टाचार हे शब्द त्यांच्या लेखीही नव्हते. उत्तुंग व्यक्तिमत्त्व आणि समाजवादी मानसिकतेतून त्यांनी राज्याला विकासाच्या बाबतीत आकार देण्याचा प्रयत्न केला. राज्यकर्त्यांनी नेमक्या कोणत्या योजना समाजापर्यंत पोहोचवाव्यात, याची दूरदृष्टी त्यांच्यात होती. दुर्दैवाने तेव्हाच्या आणि आताच्या राजकारणात मोठी तफावत दिसत आहे. आजचे राज्यकर्ते जनतेला हवा तसा न्याय देत नसल्याने लोकांमध्ये त्यांच्याप्रति राग निर्माण होत आहे. पूर्वी शिक्षण, उद्योग आणि कृषी क्षेत्राच्या बाबतीत महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य होते. आज या तिन्ही क्षेत्रात हे राज्य कुठे आहे, याचाही विचार होणे गरजेचे आहे.


या वेळी प्रश्नोत्तराचेही सत्र रंगले. प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष विश्वास ठाकूर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. कैलास कमोद यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला, तर संजय नागरे यांनी स्वागत केले. कार्यक्रमास डॉ. शोभा बच्छाव, अशोक धात्रक, कृष्णा भगत, प्राचार्य हरीश आडके, प्राचार्य खेडकर, शरद पुराणिक, रमेश देशमुख, सुरेश मेणे आदी उपस्थित होते.


स्वत:चा दबावगट असावा
दिल्लीच्या राजकारणात मराठी नेत्यांना लांब फेकले जात असल्याचे सांगतानाच यापुढे नवीन विचाराने प्रगती करणे गरजेचे असल्याचे सांगून खांडेकर म्हणाले की, महाराष्ट्र पुढे जावा अशी यशवंतरावांची इच्छा होती, तशी प्रत्येक नागरिकानेही चांगल्या पक्षाला, चांगल्या नेत्याला निवडून देण्याची इच्छा बाळगावी आणि स्वत:चा दबावगटही तयार करावा. त्यातून चांगली कामे करून घेता येतील. मतदानाविषयी जागरूकताही निर्माण होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीकडे योग्य संधी म्हणून पाहावे, असेही खांडेकर यांनी शेवटी सांगितले.

‘मराठा’ आणि ‘मराठी’मध्ये गल्लत
ज्यांना ‘बिमारू’ म्हणून संबोधले जायचे, अशी राज्ये आज प्रगतिपथावर असताना महाराष्ट्र मात्र तितक्या गतीने पुढे सरकताना दिसत नाही. यशवंतराव चव्हाण यांनी जपलेले मराठीपण राज्यातून दिसेनासे होत आहे. ‘मराठा’ आणि ‘मराठी’ या संकल्पनेत गल्लत करीत आपण समाजाचे दोन भाग पाडत आहोत का, असा प्रश्नही खांडेकर यांनी या वेळी उपस्थित केला.