आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्‍योती आम्हीच चेतवतो... अन‌् आम्‍ही फुंकतो चेतना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- यंदाच्यादीपोत्सवात स्वत:च्या आयुष्यात काही न्यून असतानाही इतरांचे आयुष्य प्रकाशासह उत्साहाने भरण्याच्या निर्धाराने प्रबोधिनी ट्रस्ट संचलित श्रीमती सुनंदा केले विद्यामंदिरातील विशेष विद्यार्थ्यांनी शेकडो पणत्या आणि आकाशकंदील बनविले. त्यांची ही ‘विशेष'अशी कामगिरी सर्वांच्याच कौतुकाचा विषय ठरली आहे.
विद्यार्थ्यांना दीपोत्सवाचे वेध लागले असून, यासाठी त्यांनी वेगवेगळ्या आकार आणि प्रकारच्या आकर्षक पणत्या रंगविल्या आहेत. शाळेत दरवर्षी मुलांकडून अशा कलाकृती तयार करून घेतल्या जातात. अनेकदा या कलाकृती मुलांना स्वत:च्या आवडीने तयार करण्याची संधी मिळते. शिक्षक इतर कर्मचा-यांचाही यात सहभाग असतो. मुलांना रंगसंगती शिकवण्यापासून तर त्यांना या पणत्या रंगविताना ब्रशवर नियंत्रण येईपर्यंतच्या सर्वच गोष्टी शिकवण्यात शिक्षकांचे कसब असते. आकाशकंदीलांसाठीचे कातरकाम फक्त शिक्षक मुलांना तयार करून देतात, जेणेकरून त्यांना दुखापत होणार नाही. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, अगदी महागड्यात महागड्या कंपन्यांतही अशाप्रकारच्या आकाशकंदीलांची निर्मिती होत नसावी, असे कंदील हे चिमुकले तयार करतात. शिक्षकांप्रमाणेच या विद्यार्थ्यांच्या पालकांकडूनही चांगली साथ मिळते. शाळेशी निगडित मित्रपरिवार दरवर्षी स्वयंस्फूर्तीने या पणत्या, कंदील विकत घेतात. परिसरातील काही लहान कंपन्यांनी या शाळेतील विद्यार्थ्यांना पणत्यांच्या ऑर्डर्सदेखील दिल्या आहेत. मुलांच्या शारीरिक क्षमतेप्रमाणे शाळा या मागण्या पूर्ण करते. जेणेकरून शाळेला आर्थिक हातभार तर लाभतोच, शिवाय मुलांच्या सर्वांगीण विकासालाही चालना मिळते. विद्यार्थ्यांनी सुमारे 400 पणत्या आणि आकाशकंदील तयार केले आहेत. त्याचबरोबर उपवासाची, थालीपीठाची भाजणी, ऑरगंडीची फुले, रूमाल अशा ब-याच वस्तूही तयार केल्या आहेत. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी या सर्व उपक्रमांचा लाभ होतो.
शाळेसाठी गर्वाचीच बाब
आमच्याविनाअनुदानित शाळेतील ही विशेष मुले जेव्हा माणसांमध्ये वावरायला शिकतात, तेव्हा त्यांना या उपक्रमांचा फायदा होतो. मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे उत्पादनांवर मर्यादा येतात. मुलांचे कौतुक ही गर्वाचीच बाब. -शोभा बिल्लाडे, मुख्याध्यापिका प्रबोधिनी ट्रस्ट संचलित श्रीमती सुनंदा केले विद्यामंदिरात आकर्षक आकाशकंदील बनविताना विशेष विद्यार्थी आणि विद्यालयातील शिक्षिका.
वर्षभर राबवतात उपक्रम
विशेषविद्यार्थ्यांच्या या शाळेमध्ये मुले वर्षभर वेगवेगळ्या वस्तू बनवत असतात. ज्यामध्ये फुलांचे गुच्छ, भाजण्या आणि सुपारीना या पदार्थांचा समावेश आहे. सुपारी नसलेले मुखवास म्हणजे सुपारीना हे शाळेचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणावे लागेल. या वस्तू शाळेशी निगडित मित्रपरिवार आणि हितचिंतकांना मागणीनुसार उपलब्ध करून दिले जातात.