आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघाती नाका अन् जिवाला धोका

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - आडगाव मेडिकल फाटा ते ओझर जकातनाका भागात महामार्ग रस्ता ओलांडण्याकरिता पादचार्‍यांना आणि परिसरातील वाहनधारकांसाठी जीवघेणा ठरत असल्याचे चार महिन्यांत झालेल्या अपघातांनी उघड झाले आहे. अवघ्या तीन किलोमीटरच्या या रस्त्यावर तब्बल 12 जणांचे बळी गेले असूनही या अपघातांकडे गांभिर्याने पाहिले जात नसल्याबद्दल नागरिकांमध्ये रोष आहे.

महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर तो वाहतुकीसाठी खुलाही करण्यात आला आहे. काही ठिकाणी उड्डाणपुलाचे तर काही ठिकाणी सर्व्हिस रस्त्याचे काम अपूर्णच आहे. असे असतानाही महामार्गावर भरधाव वेगात होणारी वाहतूक परिसरातील नागरिकांसाठी आणि लहान वाहनधारकांसह पादचार्‍यांसाठी जीवघेणी ठरत आहे. मेडिकल फाटा ते जुना जकातनाका याठिकाणी असलेल्या चौफुलीवर भरधाव होणार्‍या वाहतुकीवर नियंत्रण नसल्याने वाहनधारकांसह परिसरातील नागरिकांना पादचार्‍यांना मार्ग ओलांडताना जीव मुठीत धरूनच जावे लागते. हा प्रकार केवळ महामार्गाच्या चुकीच्या नियोजनामुळे होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. रस्ते प्राधिकरण विभाग व रस्ता बनवण्याचे कंत्राट घेणार्‍या कंपनीच्या अधिकार्‍यांनी सुरक्षेच्या उपाययोजना केल्या नसल्याचे झालेल्या कामांवरून निदर्शनास येत आहे.


असा आहे मार्ग
हॉटेल जत्रा चौफुली ते आडगाव मेडिकल फाट्यापर्यंत पादचारी आणि लहान वाहनधारकांसाठी सुरक्षतेच्या कुठल्याही उपाययोजना नाहीत. भुजबळ मेट कॉलेज ते जुना ओझर जकातनाका या मार्गावर असलेल्या चौफुली अत्यंत घातक आहेत. या चौफुलीचा वापर आडगाव, विंचूरगवळी, पिंप्री आणि परिसरात जाण्याकरिता मोठय़ा प्रमाणात वापर होणारी चौफुली आहे. महामार्गावर असणारे हॉटेल, धाबे, ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांची अवजड वाहने, शहर वाहतूक करणारे बसेसही दिवसरात्र धावतात.

सुरक्षित वाटत नाही
आडगावच्या वाढता परिसरामुळे लोकसंख्या वाढली आहे. मार्गालगत नागरी वस्ती वाढली आहे. रात्री मार्गावर लाइट नाही. भरधाव वेगात होणार्‍या वाहतुकीवर नियंत्रण नसल्याने मार्ग सुरक्षित वाटत नाही. अँड. नामदेव शिंदे, नागरिक

समांतर रस्ता लवकर बनवावा.
मार्गाचे चौपदरीकरण झाले.त्यामुळे भरधाव वेगाने होणारी वाहतुकीत दुचाकी चालवावी लागते रात्री मोठे वाहने भरधाव वेगाने जा-ये करतात. सुरक्षिततेसाठी रखडलेला समांतर रस्ता लवकरात लवकर बनवावा. तरच या रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण कमी होण्यास मदत मिळू शकणार आहे. मधुकर जाधव, मंगेश जाधव, बाळासाहेब जाधव, नागरिक

पाठपुरावा करणार
परिसरातील नागरिकांच्या याबाबत तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार महामार्गवरील रखडलेला सर्व्हिस रस्ता त्वरित होण्याकरिता रस्ते प्राधिकरण विभाग आणि प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल गणेश चव्हाण, नगरसेवक