आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिटीबसच्या धडकेनंतरही पाच दुचाकीस्वार सुखरूप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड- येथीलदत्तमंदिर चौकात बुधवारी (दि. ७) दुपारी दीडच्या सुमारास शहर बसने पाच दुचाकींना जोरदार धडक दिली. मात्र, दुचाकीस्वारांचे दैव बलवत्तर म्हणून सारे या भीषण दुर्घटनेतून सुखरूप बचावले. दोन महिलांसह एक जण जखमी झाला. पाचही दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर बसचालकाने बस सोडून पलायन केले. बसचे ब्रेक निकामी झाल्याने अपघात झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
नाशिक-पुणे महामार्गावरून नाशिकरोडकडून सातपूरकडे जाणाऱ्या बसने (एमएच १५, एके ८०८८) नाशिककडे जाणाऱ्या उजव्या डाव्या बाजूच्या पाच दुचाकींना धडक दिली. धडकेनंतर दोन दुचाकी (एमएच १५, एक्स ९९२४ एमएच १५, बीपी ८२०८) उजव्या, तर तीन दुचाकी (एमएच १५ बीई २६३२, एमएच १५ इएम १२४० एमएच १५ डीव्ही ९०५९) डाव्या बाजूच्या पुढच्या चाकाखाली सापडल्या. त्याचवेळी दोन्ही बाजूंनी मोठी वाहने जात असल्याने या अपघातात काेणीच बचावलेला नसावा, अशी शक्यता प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केली. सुदैवाने अपघातात केवळ वाहनांचे नुकसान झाले. उजव्या बाजूने जाणाऱ्या एका ट्रकच्या चालकाने (एमएच १८, एम ७०६२, मनोहर मारुती तारे) वेळीच ब्रेक लावल्यानेही मोठी दुर्घटना टळली.
दुचाकीवरील अनिता संजय शिंदे (३८, डीजीपीनगर), पुष्पा रावसाहेब भागवत (५०) रावसाहेब भागवत (६६, दोघे रा.भोर मळा) हे जखमी झाले. जखमींना वरिष्ठ पोलिस निरीक्षक हनुमंत गाडे यांनी शासकीय वाहनातून बिटको रुग्णालयात दाखल केले. दुचाकीस्वारांनी तक्रार दिली नसल्याने रात्री उशिरापर्यंत पाेलिसांत गुन्हा दाखल झाला नव्हता.
तपासणी करूनच बस सोडावी
बसस्थानकावरून बस सोडताना बसची तपासणी केली पाहिजे. वाहक-चालकांनी बसचे ब्रेक, लाइट सुरू असल्यानंतरच आगाराबाहेर किंवा स्थानकाबाहेर ती काढली पाहिजे. आज सुदैवाने जीवितहानी झाली नाही; अन्यथा किती मोठा अनर्थ झाला असता, याची कल्पनाही करवत नाही. अतुल धोंगडे, प्रत्यक्षदर्शी नाशिकरोड येथील वर्दळीच्या दत्तमंदिर चौकात शहर बसने धडक दिल्याने पाच दुचाकी अशा पडल्या होत्या.
ब्रेक निकामी, वाहतूक ठप्प
सिग्नलवरउभ्या राहिलेल्या बसमुळे दोन्हीकडची वाहतूक ठप्प झाल्याने पाेलिसांनी बस बाजूला घेण्याचा प्रयत्न केला असता, बसचे ब्रेक निकामी असल्याचे लक्षात आल्याने बस बाजूला घेण्याचे धाडस त्यांनी केले नाही.
दुचाकीस्वारांचा जणू पुनर्जन्मच...
नाशिकरोडच्या बाजूला वाहतूक शाखेचे वरिष्ठ निरीक्षक हनुमंत गाडे सिग्नल सुटण्याची वाट पाहत असताना समोरचा अपघात पाहून त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. सर्वप्रथम जखमींना आपल्या शासकीय वाहनातून बिटको रुग्णालयात दाखल केले. अपघाताचे गंभीर स्वरूप पाहिल्यानंतर त्यांनी सर्वांचाच पुनर्जन्म झाल्याची प्रतिक्रिया दिली.