आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस प्रबोधिनीत कारची धडक; दोन जखमी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- महाराष्ट्र पोलिस प्रबोधिनीच्या आवारात भरधाव वेगाने कार चालवणार्‍या प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षकाचे नियंत्रण सुटल्याने दोघांना धडक बसून ते जखमी झाले. या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरक्षिततेसाठी प्रचंड बंदोबस्त आणि सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची नजर असतानाही प्रशिक्षणार्थीकडे कार कशी पोहोचली, याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे.

प्रशिक्षणार्थी अकरोज तैमुरखान पठाण व सचिन पालवे सोमवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास गोदावरी वसतिगृहाकडे जात असताना वर्ना कारने (एम. एच. 15, डी. सी. 5371) या दोघांना मागून धडक दिली. त्यांना प्रबोधिनीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. अंतर्गत सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसांनी शोध घेतला असता प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षक हनुमंत पडळकर कार चालवत असल्याचे समोर आले. गंगापूरचे सहायक निरीक्षक सपकाळे तपास करीत आहेत. ही कार पडळकर यांच्या मित्राची असल्याचे सांगण्यात आले. ती प्रशिक्षणार्थीकडे कशी आली, याचा तपास सुरू असल्याचे समजते. लष्कर-ए-तोयबाच्या अतिरेक्यांनी प्रबोधिनीची रेकी केल्याचे उघडकीस आल्यानंतर प्रबोधिनीच्या सुरक्षिततेत वाढ करण्यात आली आहे. असे असताना अज्ञात कार आवारात गेल्याने प्रबोधिनीतील अंतर्गत सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह लागले आहे.