आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघातांची मालिका; तरीही ना उपाययाेजना, ना नियाेजन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- नाशिक-पुणेमहामार्गावर सातत्याने वाहनांची वर्दळ सुरू असते. नासर्डी पूल ते दत्तमंदिर सिग्नलपर्यंत महामार्गाच्या दोन्ही बाजूला गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरी वसाहत झाली असून, अास्थापनांची संख्याही वाढतीच अाहे. त्यामुळे नागरिक, महिला, विद्यार्थी, कामगार यांचीही महामार्गावरून मोठ्या संख्येने वर्दळ असते. याच महामार्गावरील नासर्डी पूल ते दत्तमंदिर सिग्नलपर्यंत दोन्ही बाजूला अनेक ठिकाणी रस्त्याच्या मधोमध असलेले वृक्षही वाहनचालकांच्या जीवितास धाेकादायक ठरतात. विशेष म्हणजे, कुठेही गतिराेधक नसल्याने वाहने भरधाव वेगाने जातात. त्यामुळे नागरिक, कर्मचारी, विद्यार्थ्यांना रस्ता अाेलांडणे धाेक्याचे ठरते. या पार्श्वभूमीवर अनेकांनी अावश्यक त्या ठिकाणी सिग्नल यंत्रणा बसविण्याची मागणी करून, त्यासंदर्भात पाठपुरावा करूनदेखील वाहतूक पाेलिस, महापालिका प्रशासनाकडून दुर्लक्षच हाेत असल्याच्या तक्रारी अाहेत.परिणामी, अाजही या ठिकाणी अपघातांची मालिका कायम असून, वाहतूक काेंडीचा प्रश्न जटिल बनला अाहे. उपनगर परिसरातदेखील अनेकदा वाहतूक काेंडी हाेऊन अपघातांची संख्या वाढत अाहे. गेल्या अाठवड्यात या ठिकाणी दाेघांना अपघाती जीम गमवावा लागूनदेखील या ठिकाणी गतिराेधक, झेब्रा क्राॅसिंग, सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केली जात नसल्याने अाश्चर्य व्यक्त केले जात अाहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण समितीकडून हाेणाऱ्या या दुर्लक्षामुळे वाहनचालकांसह परिसरातील नागरिकांनीही संताप व्यक्त केला अाहे.
अपघाताची मालिका सुरूच
नाशिक-पुणेमहामार्गावर उपनगर नाका या परिसरात झालेल्या अपघातात आतापर्यंत अनेकांना जीम गमवावा लागला अाहे, तर अनेक जण गंभीर जखमीही झाले अाहेत. या ठिकाणी वेळीच याेग्य त्या उपाययाेजना झाल्यास अपघातांची ही मालिका सुरूच राहील, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली अाहे.

वाहतूक पोलिस हवेत
^द्वारकाते उपनगरपर्यंत आतापर्यंत शेकडो अपघात झाले आहेत. या रस्त्यावरील वृक्ष काढून रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली अतिक्रमणेही हटवायला हवीत. चौकांत वाहतूक पोलिस असल्यास अपघात टळतील. - अानंद पगारे

गांभीर्याने लक्ष द्यावे...
^उपनगर चौकात कोणत्याही प्रकारे नियोजन करता उभारण्यात आलेल्या बस थांब्यामुळे या ठिकाणी रोज एक तरी अपघात होताेच. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. - गजानन मांडे, नागरिक

पाठपुरावा करूनही हाेतेय दुर्लक्ष..
^अावश्यक तेथे वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी, तसेच सिग्नल यंत्रणा पुन्हा सुरू करावी, यासाठी प्रयत्न करत आहाेत. तसेच, महामार्गावरील धोकादायक वृक्ष हटवण्यासाठी राष्ट्रीय प्राधिकरण समितीकडे वारंवार पाठपुरावा करताेय, पण त्यांच्याकडून दुर्लक्षच हाेत आहे. - प्रा. कुणाल वाघ, नगरसेवक

दुभाजकही धोकेदायक
नाशिक-पुणे महामार्ग परिसरातील रस्ता दुभाजकाचे कामदेखील अर्धवट स्थितीत झालेले आहे. रंगरंगोटी, सूचनाफलक लावल्याने वाहनधारकांचा गोंधळ उडतो. मुख्य म्हणजे, नकाे त्या ठिकाणी पंक्चर्स काढण्यात अाल्याने अपघातांची संख्या वाढत असल्याची बाबही प्रशासनाने दुर्लक्ष करून चालणारी नाही.

सिग्नल यंत्रणेची गरज
उपनगर नाका येथे पहाटेपासून तर रात्री उशिरापर्यंत वाहनांची वर्दळ असते. अशा परिस्थितीत सिग्नल यंत्रणा बसवणे गरजेचे असताना, वाहतूक पाेलिस, मनपा प्रशासनाकडून डीजीपीनगर वळण रस्त्यावरील चौकात सिग्नल बसवण्यात आले. उपनगर नाक्यावर गरज असताना डीजीपीनगर वळण रस्त्यावर ते बसवण्याची घाई करण्यात अाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली अाहे.

शहरातील अनेक अपघात केंद्रे दुर्लक्षित
शहरातील अनेक ठिकाणी सध्या अपघात केंद्र निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. यात द्वारका, सारडा सर्कल, तिगरानिया चौफुली, नाशिकरोडचा दत्तमंदिर चौक ते द्वारकापर्यंतचा परिसर, पंचवटी परिसरातील निमाणी चौक, दिंडोरीरोडवरील तारवालानगर, मेरी कार्यालयजवळ यासह सिडको भागातील त्रिमूर्ती चौक, सातपूर भागातील आयटीआय सिग्नल या ठिकाणी अपघातांची संख्या गेल्या काही दिवसांपासून वाढली आहे. मात्र, हे सर्वच अपघात केंद्र वाहतूक पाेलिस अन‌् पालिका प्रशासनाच्या उदासीनतेमुळे दुर्लक्षित अाहेत. परिणामी, या ठिकाणी हाेणाऱ्या अपघातांत अनेकांना जीम गमवावा लागला अाहे.

सिग्नल यंत्रणा नावालाच; पाेलिसही गायब
नाशिक-पुणे महामार्गावर नाशिकरोडच्या दत्तमंदिर चौकात द्वारका जवळील काठे गल्ली येथे वाहतुकीची कोंडी वाढते अपघात लक्षात घेऊन मनपा प्रशासनाकडून काही वर्षांपूर्वी सिग्नल बसविण्यात आले होते. तसेच, त्यानंतर काही वर्षांपूर्वी विजय-ममता चित्रपटगृहाजवळील परिसरात अशोका मार्ग निर्माण झाल्यानंतर त्या ठिकाणी वाढती वाहतूक लक्षात घेऊन या चौफुलीवर सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली. मात्र, या सर्वच ठिकाणी अनेकदा वाहतूक पोलिसच हजर राहत नसल्यामुळे हे सिग्नल केवळ नावालाच सुरू राहात असल्याचा प्रकारही ‘डी. बी. स्टार’च्या पाहणीत दिसून अाला.

झाडांमुळे अपघातांना निमंत्रण
कुंभमेळ्याच्या निमित्ताने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून द्वारका ते दत्तमंदिर सिग्नलपर्यंतचा रस्ता सहापदरी करण्याचे नियोजित होते. मात्र, त्याकडे गांभीर्याने लक्ष दिल्याने तांत्रिक अडचणींमुळे महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम रखडले आहे. रुंदीकरणाऐवजी नासर्डी पूल ते दत्तमंदिर सिग्नलपर्यंत महामार्गाच्या दोन्ही बाजूने तीन ते चार फुटांचे डांबरीकरण करून रस्ता वाढविण्यात आला. यामुळे अनेक झाडे आता रस्त्याच्या मधोमध आली आहेत. त्यामुळे महामार्गाचे नावापुरते रुंदीकरण करूनदेखील वाहनधारकांच्या दृष्टीने काहीएक फायद्याचे झालेले नाही. उलटपक्षी ते वाहनधारकांच्या दृष्टीने धोक्याचे ठरत आहे. रस्त्याच्या मध्यभागी आलेली झाडे चुकवताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत असून, अशा स्थितीत अपघातांची शक्यता अधिक बळावते.

महामार्गावर द्वारकाकडून अार्टिलरी सेंटर, जय भवानीराेडकडे जाणाऱ्या रस्त्याकडे जाताना वाहनचालक सर्रासपणे उलट दिशेने वाहन दामटवतात. यामुळे नाशिकराेडकडून येणाऱ्या वाहनांना अडथळा तर हाेताेच, शिवाय अपघातही हाेतात.

उपनगर परिसरात झालेल्या अपघातात दाेघांचा बळी गेल्यावर प्रशासनाने या ठिकाणी बॅरिकेड्स उभे केले. मात्र, अपघातसंख्या राेखण्यात ही उपाययाेजना अपुरीच असून, वाहनचालकांकडून अशाप्रकारे त्यातून वाट काढली जात असल्याने अपघात हाेतच अाहेत. वाहतूक पाेलिसांच्या दुर्लक्षामुळे ही समस्या अाजही कायम असून, असेच सुरू राहिल्यास अाणखी बळी जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

नाशिक-पुणे महामार्गावर अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी हाेऊन अपघातांची मालिका सुरू अाहे. सर्वाधिक वर्दळीच्या उपनगर नाक्यावरील कोंडीचे हे चित्रही राेजचेच.

बसथांबाही कारणीभूत
उपनगरनाका परिसरात वाहतूक कोंडीची समस्या नेहमीचीच झाली आहे. अाता या ठिकाणी झालेल्या बसथांब्यामुळे परिस्थिती अधिक बिकट झाली अाहे. या चुकीच्या ठिकाणी उभारलेल्या थांब्यामुळे बसेस थेट रस्त्यावर उभ्या राहत असून, पाठीमागून येणाऱ्या वाहनांची त्रेधा उडते. अनेकदा अपघातही हाेतात. हा बसथांबा काही अंतर पुढे हलवण्याची मागणीही स्थानिकांकडून हाेत आहे.
बातम्या आणखी आहेत...