आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Accident News In Marathi, Aviation Fuel, Divya Marathi

विमान इंधन पेटल्याने अग्नितांडव, कोणतेही जीवितहानी नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सटाणा/ ताहाराबाद - विंचूर-प्रकाशा राज्य महामार्गावरील आव्हाटी फाट्यानजिक विमानाचे इंधन घेऊन जाणारा टॅँकर लोखंडी सळ्या घेऊन जाणारा कंटेनर यांच्यात भीषण अपघात होऊन झालेल्या घटनेत टॅँकरला आग लागून राज्य महामार्गावर सुमारे चार तास अग्नितांडव सुरू होते. या भीषण आगीत दोन्ही वाहनांसह चार मोटारसायकली आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी अर्धा एकर कांदा, एक ट्रक चारा, व तीन ट्रक खत खाक झाल्याने दोन शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे.


या दुर्घटनेमुळे राज्य मार्गावरील वाहतूक सुमारे सहा तास ठप्प झाली होती. आगीत जळून खाक झालेले टॅँकर (जीजे 18-टी-1287) हा साबरमती (गुजरात) हून पुणे विमानतळावर एटीएफ ( एअर टबरेजेट फ्यूएल) इंधन घेऊन जात होते. दुपारी दीड वाजता वीरगावनजिक असलेल्या लकड्या पुलाच्या तीव्र वळणावर सटाण्याकडून गुजरातच्या दिशेने जाणार्‍या कंटेनर (आरजे 01 जीए 2367) व टॅँकर यांच्यात भीषण अपघात होऊन टॅँकरने पेट घेतला. काही क्षणात आगीने रौद्ररूप धारण केल्याने दूरवर आगीचे लोळ दिसून येत होते. अचानक घडलेल्या या अग्नितांडवामुळे रस्त्यावरून जात असलेल्या दुचाकीस्वारांनी आपल्या दुचाकी सोडून पळ काढल्याने चार दुचाकींची जागेवरच राख झाली. दुचाकीस्वारांपैकी तालुक्यातील जैतापूर येथील विठ्ठल कृष्णा चौधरी जखमी झाले असून, त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, टॅँकरच्या मागून कारने प्रवास करणारे नाशिक येथील डॉ. संदीप भामरे यांनी समयसूचकता दाखवून बाजूच्या शेतात कार घुसवली व ते बालंबाल बचावले.


6 वाजता वाहतूक पूर्ववत
आग इतकी भयानक होती की, मालट्रकमधील गज व सळईदेखील त्यापासून सुरक्षित राहू शकल्या नाहीत. सुमारे 25 किलोमीटरपर्यंत आगीचे काळे लोळ दिसत होते. त्यामुळे बघ्यांची गर्दी घटनास्थळाकडे येण्याचा प्रयत्न करीत होती, तर पोलिसांनी सतर्कतेचा उपाय म्हणून वाहतूक ताहाराबाद-नामपूर तसेच सटाणा नामपूर अशाप्रकारे वळवून कोंडी टाळली. अग्निशमन दलाने सुमारे साडेपाच वाजता आग पूर्णपणे शमविली. त्यानंतर 6 वाजता वाहतूक सुरळीत सुरू झाली.


अग्निशमनची यंत्रणा कुचकामी
आगीची माहिती कळवूनही अग्निशमन यंत्रणा दीड तासात घटनास्थळी पोहचल्याने अग्निशमन वाहनाचा काहीच उपयोग झाला नाही. आगीने सर्वच वाहने भस्मसात झाल्यानंतर अग्निशमन दल पोहचण्याची परंपरा यावेळीही कायम राहिली.