आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Accident News In Marathi, Traffic, Divya Marathi, Mumbai Agra Highway

तिहेरी अपघात: वाहतूक सुरळीत होण्यास लागले तब्बल 11 तास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टॅँकरच्या धडकेने बस एका बाजूने अशी पूर्णत: कापली जाऊन तिचा चुराडा झाला. छाया : सुनील थोरे - Divya Marathi
टॅँकरच्या धडकेने बस एका बाजूने अशी पूर्णत: कापली जाऊन तिचा चुराडा झाला. छाया : सुनील थोरे
चांदवड - मुंबई-आग्रा महामार्गावरील राहुड घाटात शनिवारी सायंकाळी झालेल्या तिहेरी अपघातात भारत पेट्रोलिअम कंपनीचा गॅस टॅँकर हा पाच प्रवाशांच्या मृत्यूस कारणीभूत ठरला. हा भारत पेट्रोलिअम कंपनीचा गॅस टॅँकर व दुधाचा टॅँकर रस्त्यावरून हलविण्यासाठी पोलिसांना 11 तास लागले. रविवारी पहाटे 5 वाजेनंतर मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. या अपघाताच्या संदर्भात भारत पेट्रोलिअम गॅस कंपनीच्या टॅँकर चालकाविरुद्ध चांदवड ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

टॅँकर चालक नेमका कोठून कोठे चालला होता याची माहिती दुसर्‍या दिवशीही चांदवड पोलिसांना मिळाली नाही. ट्रक 80 ते 90 कि.मी.च्या वेगाने जात होता. पायथ्यालगत 90 अंशांचा कोन असल्याने चालकाला वळण न घेता आल्याने तो दुभाजकावर जाऊन आदळला. त्याच वेळी मालेगावकडून नाशिककडे येणारी खामगाव आगाराची बस या गॅस टॅँकरच्या कचाट्यात सापडून यात पाच जणांचा निष्पाप बळी गेला. या गॅस टॅँकरच्या चालकाचे शव रात्री उशिरा काढल्याने त्याची ओळख पटली नव्हती. दुसर्‍या दिवशी या मयत चालकाचे नाव सुनील सुरेश प्रसाद (वय 26) असून तो उत्तर प्रदेश येथील रहिवासी असल्याचे समजले.

अपघातानंतर भारत पेट्रोलिअम कंपनीच्या टॅँकरमधून गॅसची गळती चालू होती. त्यामुळे महामार्गावरील सर्व वाहतूक देवळा, मनमाडमार्गे वळविण्यात आली. दोन्ही टॅँकर उचलण्यासाठी मंगरूळ येथील सोमा कंपनीच्या दोन क्रेन व मालेगाववरून एक क्रेन बोलाविण्यात आल्या होत्या. टॅँकरमधून गॅस पूर्णपणे निकामी होण्यासाठी रात्रीचे 3 वाजले. घटनास्थळी नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संजय मोहिते, मालेगावचे अपर पोलिस अधिकारी सुनील कडासने, आदीसह मोठी पोलिस फोर्स रात्रभर उपस्थित होता.

मोटरवाहन निरीक्षक जयवंत कोर,सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी सुदाम सूर्यवंशी, मालेगावचे उपप्रादेशिक अधिकारी सुधाकर मोरे यांनी घटनास्थळी येऊन वाहनाची यांत्रिक तपासणी केली.भारत पेट्रोलिअम गॅस कंपनीच्या टॅँकरमधून निघणारा हायड्रोकार्बन हा अत्यंत ज्वलनशील द्रव पदार्थ होता.

ही गॅस गळती होत असताना घटनास्थळी कोणीही ज्वलंत पदार्थ पेटविला असता तर मोठा स्फोट झाला असता. या मध्ये मोठय़ा प्रमाणावर जीवितहानी झाली असती, अशी माहिती मनमाड येथील इंडियन ऑइल ल.पी.जि.बॉटलिंग प्लांट व्यवस्थापक व्ही.एम.बासुतकर यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.