आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाण्यासाठी ‘संघर्ष’ करताना गेला सोनालीचा बळी..

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडको - मुंबई-नाशिक महामार्गावर विल्होळीनजीक बुधवारी सकाळी कारच्या धडकेमुळे पाण्याचा हंडा घेऊन रस्ता ओलांडणारी युवती जागीच ठार झाली. कुटुंबीयांची तहान भागवण्यासाठी पाणी नेताना युवतीचा बळी गेल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळी 8 वाजेच्या सुमारास अक्षय अविनाश टिळे (वय 19, रा. शिवाजी चौक, सिडको) वेगाने अल्टो कार (एम एम 15 सीडी 2747) चालवत मुंबईकडे जात होता. याच वेळी संघर्षनगर येथील सोनाली भाऊसाहेब गायकवाड (वय 18) हंड्यात पाणी भरून महामार्ग ओलांडत होती. कारची जोरदार धडक बसल्याने ती जागीच गतप्राण झाली. पोलिसांनी टिळेला त्वरित ताब्यात घेतले. त्यालाही जबर मार लागल्यामुळे खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

हंडाभर पाण्यासाठी..

संघर्षनगरमध्ये विल्होळी व आजूबाजूच्या भागात खाणीत काम करणारे कामगार राहतात. या वस्तीला प्रशासनाच्या कोणत्याही सुविधा मिळत नाहीत. तेथे पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आहे. त्यामुळे महामार्गाच्या बाजूला असणार्‍या हॉटेल व्यावसायिकांकडून पाणी आणावे लागते. डोक्यावर हंडा-कळशी घेऊन, जीव मुठीत धरून महिला-मुली रस्ता ओलांडतात. बुधवारी त्यातच सोनालीचा दुर्दैवी अंत झाला.