आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवयव मिळवण्यासाठी अपघातग्रस्त महिलेला ‘ब्रेनडेड’ घाेषित करण्याची घाई; अवयवदानाचा गैरफायदा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- अवयवदानाच्या कल्याणकारी चळवळीचा गैरफायदा घेणारे रॅकेट नाशिकमध्ये असल्याचा संशय बळावला आहे. हृदय व किडनीसारखे अवयव मिळवण्यासाठी २ बड्या रुग्णालयांनी नातेवाइकांना  भावनिक अावाहन करून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याआधीच अपघातग्रस्त जया मगर-जामदार यांना ब्रेनडेड घाेषित करण्याची घाई केली, अशी तक्रार  नाशिक मनपा वैद्यकीय विभागाकडे अाली.
 
विशेष म्हणजे त्यांच्या हृदयाला छिद्र असल्यामुळे मुंबईतील खासगी रुग्णालयाच्या पथकाने ते हृदय स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर नाशकातील रुग्णालयाने संबंधित महिलेचा मेंदू काही प्रमाणात कार्यरत असल्याचे सांिगतले. आधी अवयवदानासाठी माेफत प्रक्रिया हाेते, असे सांगणाऱ्या रुग्णालयाने नंतर झालेला खर्च बिलाच्या स्वरूपात वसूल करण्यासाठी तगादा लावल्याचा अाराेप अाहे. दरम्यान, संबंधित प्रकरणात नाशकातील विजन व साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूटला मनपाच्या वैद्यकीय विभागाने कारणे दाखवा नाेटीस बजावत तीन दिवसांत खुलासा मागवला अाहे.
 
जया यांचे पती अश्विन जामदार  यांनी तक्रारीत म्हटले आहे की, २४ अाॅगस्टला अपघातात जया यांच्या मेंदूला जबर मार लागला. त्यांच्यावर एका हाॅस्पिटलमध्ये ३ दिवस उपचार झाले. दरम्यान, त्यांची प्रकृती खालावत असल्याचे बघून डॉक्टरांनी त्या बचावण्याची शक्यता कमी असल्याचे सांगत अवयवदानाचीही संकल्पना सांगितली.
 
कुटुंबीय राजी झाल्यानंतर अवयव काढण्याच्या प्रक्रियेसाठी जया यांना २६ अाॅगस्टला कालिदास कलामंदिराजवळील हाॅस्पिटलमध्ये हलवले. येथे मुंबईच्या खासगी हाॅस्पिटलचे पथकाने त्यांची तपासणी केली. जया यांच्या हृदयाला छिद्र असल्याचे सांगत ते प्रत्याराेपणासाठी अयाेग्य असल्याचे पथकाने सांगितले. त्यानंतर मेंदूतज्ज्ञ डाॅ. राहुल बाविस्कर यांनीही तपासणी करून जया यांचा मेंदू ८ ते १०% कार्यरत असल्याचे सांगितल्यानंतर पेच निर्माण झाला. आधी अवयवदानाची प्रक्रिया माेफत हाेईल, असे सांगणाऱ्या डॉक्टरांनी उपचारासाठी यापुढे रुग्णालयात ठेवावे लागल्यास बिल भरावे लागेल, असा अाग्रह धरला. तसेच दाखल केल्यानंतर बिलाची मागणीही केली. 

त्यानंतर पती जामदार यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना पाचारण करण्याबराेबरच ज्या हाॅस्पिटलने पाठवले तेथील डाॅ. संजीव देसाई यांनाही बाेलावून घेतले. या ठिकाणी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी देसाईंना रुग्ण उपचारासाठी दाखल झाला की अवयवदानासाठी असा प्रश्न केेला. त्यावर उत्तर न देता व्यवस्थापनाशी चर्चा करून उत्तर देताे असे देसाई म्हणाले. दरम्यान, जामदार व नातेवाइकांनी भाजप कार्यालयाशी संपर्क साधून अवयवदानाची चळवळ कशी बदनाम हाेतेय याबाबत तक्रार केली. त्यानंतर हृषिकेश हाॅस्पिटलचे डाॅ. भाऊसाहेब माेरे यांनी नि:शुल्क उपचार करण्याची जबाबदारी घेतली. उपचारादरम्यान २९ अाॅगस्टला जया यांचा मृत्यू झाला. 
आधी राजी केले, नंतर हृदयात छिद्र निघाल्याने बिल मागितले.

अपघातग्रस्त महिलेला २४ ऑगस्टला रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. संबंधित रुग्णालयाने हेच हेरून रुग्णाच्या नातेवाइकांचे अवयवदानासाठी समुपदेशन करणे सुरू केले. यावर रुग्णाच्या नातेवाइकांनी याचा खर्च कुणी करायचा अशी विचारणा केली. त्यावर हा सर्व खर्च मोफत असल्याचे रुग्णालयाने सांगितले. त्यानंतर अवयवदानासाठी या महिलेला दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु तेथे तपासणीत या महिलेचे हृदय निकामी असल्याचे सांगण्यात आले. तसेच किडनी या महिलेच्या सख्ख्या बहिणीला देण्याची मागणी नातेवाइकांनी केली. त्यानंतर संबंधित रुग्णालयाला हातात काहीच मिळेनासे झाल्याने त्यांनी बिल मागितले. परंतु महिलेच्या नातेवाइकांनी ही सर्व प्रक्रिया मोफत असल्याचे सांगितल्याने यावरून वाद उद‌्भवला व या वादातूनच घटनेचे बिंग फुटले.
 
> मुंबईतील खासगी हाॅस्पिटलला अवयव देण्यासाठी अट्टहास
 
खात्री न करताच ब्रेनडेड घाेषित
काेणालाही ब्रेनडेड जाहीर करण्यापूर्वी डाॅक्टरांच्या दाेन पथकांनी सलग सहा तास याप्रमाणे दाेन टप्प्यात रुग्णाला देखरेखीखाली ठेवणे गरजेचे अाहे. संबंधित महिलेच्या प्रकरणात तसे झालेले दिसत नाही. विजन हाॅस्पिटलमधून साईबाबा हाॅस्पिटलमध्ये रुग्णाला पाठवल्यानंतर तपासणीसाठी मी गेलाे असता मेंदू सात ते अाठ टक्के कार्यरत असल्याचे लक्षात अाले. त्यानुसार रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचितही केले. खात्री न करता ब्रेनडेड घाेषित केल्याची क्लिनिकल मिस्टेक अाहे.
- डाॅ. राहुल बाविस्कर, न्यूराे फिजिशियन
 
दाेन्ही रुग्णालयांना नाेटीस
विजन व साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट या दाेघांना वैद्यकीय विभागाने नाेटीस काढली अाहे. तीन दिवसांत त्यांच्याकडून अाराेपांबाबत खुलासा मागवला अाहे. 
-डाॅ. विजय डेकाटे, वैद्यकीय अधिकारी, नाशिक मनपा

अाम्ही केली खात्री
विजन हाॅस्पिटलने जया जामदार यांना ब्रेनडेड म्हणून पाठवले हाेते. रुग्णालयात अाल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी डाॅ. बाविस्कर यांच्यामार्फत फेरतपासणी केली. त्यात त्यांचा मेंदू कार्यरत असल्याचे लक्षात अाल्यावर अवयवदानाची प्रक्रिया थांबवली. जर अवयवदान हाेणार असेल तर माेफत प्रक्रिया केली जाते. मात्र, तसे नसल्यास रुग्णालयाचा उपचार खर्च द्यावा लागताे. त्यानुसार खर्च मागितला. त्यात गैर नाही.
 - डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, संचालक, साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट, नाशिक

नातेवाइकांच्या हट्टाखातर 
जया जामदार यांचा मेंदू मृत हाेण्याच्या स्थितीत हाेता, मात्र पूर्ण मृत नव्हता. मी जरी मृत घाेषित केले तरी अधिकृत प्रक्रियेनुसार चार वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकाने सहा तास याप्रमाणे दाेन सत्रात देखरेख करणे गरजेचे हाेते. ते करण्यापूर्वीच नातेवाइकांनी अवयवदानाचा हट्ट केल्यामुळे रुग्णाला हलवण्यात अाले. 
- डाॅ. संजीव देसाई, न्यूराेलाॅजिस्ट, विजन हाॅस्पिटल, नाशिक
बातम्या आणखी आहेत...