आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थिनीने गमावला पाय, मायलेकी स्कूटीवरून जाताना ट्रकची धडक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडको- अंबड लिंकरोडवरील शुभम पार्क त्रिफुलीवर शुक्रवारी सकाळी झालेल्या अपघातात आईसोबत स्कूटीवरून शाळेत जाणाऱ्या दहा वर्षीय मुलीच्या पायावरून ट्रकचे चाक गेले. वैद्यकीय सूत्रांनुसार, तिला कदाचित पायही गमवावा लागण्याची शक्यता आहे. तिच्या आईचाही हात फ्रॅक्चर झाला आहे.

शुक्रवारी सकाळी 10.30वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघाताने संतप्त जमावाने ट्रकचालकाला बेदम मारहाण केली. दगडफेकीत या ट्रकच्या काचा फुटल्या. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून गर्दी नियंत्रणात आणल्याने पुढील अनर्थ टळला.
शुभम पार्क येथे राहणाऱ्या सविता शशिकांत वराडे या मुलगी नेहा (वय 10) हिला शाळेत सोडण्यासाठी स्कूटी (एमएच 19, बीडी 5306) वरून जात होत्या. त्रिफुलीवरून रस्ता ओलांडताना त्रिमूर्ती चौकाकडे जाणाऱ्या ट्रकने (एमएच 15, एके 5100) स्कूटीला जोरदार धडक दिली. त्यात आई व मुलगी दोघीही ट्रकसमोर पडल्या. ट्रकचे पुढील डावीकडचे चाक मुलीच्या पायावरून गेले. यावेळी जमलेल्या नागरिकांनी दोघांना खासगी रुग्णालयात दाखल केले. जमावाने ट्रकचालकाला बेदम मारहाण केली, ट्रकच्या काचा फोडल्या. या अपघाताच्या घटनेप्रकरणी अंबड पोलिसांत ट्रकचालक अशोक मुरलीधर सोनवणे (रा. सिंहस्थनगर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी ताब्यात घेतले.
वाहतूक पोलिस गेले कुठे?
या भागात वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाल्याने वेळोवेळी वाहतूक पोलिस नियुक्तीची मागणी झाली आहे. मात्र, वाहतूक पोलिस कुठेही दिसत नाहीत. नाकाबंदी होणाऱ्या भागात केवळ दुचाकीचालकांवर कारवाई केली जाते, मात्र बेशिस्त वाहतुकीवर नियंत्रण केले जात नसल्याचा आरोप होत आहे.
लिंकरोड मृत्यूचा सापळा
त्रिमूर्ती चौक ते अंबड लिंकरोड मृत्यूचा सापळा बनला आहे. अनेक दिवसांपासून येथे अपघातांची मालिका सुरू असून, अनेकांनी जीव गमावला आहे. त्रिमूर्ती चौक येथे काही महिन्यांपूर्वी दोन शाळकरी मुले ट्रकखाली चिरडून मृत्युमुखी पडली होती. वर्षभरात या रस्त्यावर ६ ते ७ जणांचा अपघातांत बळी गेला आहे. अवजड वाहतूक बंद करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
अतिक्रमणे अडथळा
त्रिमूर्ती चौक ते पाथर्डी फाटा या संपूर्ण रस्त्यावर स्वीट मार्ट व दूधविक्रेत्यांनी प्रचंड अतिक्रमणे केली आहेत. त्यांचे ग्राहक रस्त्यावर वाहने लावतात. इतरही व्यावसायिक बेजबाबदारपणे रस्त्यावर व्यवसाय थाटतात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा होतो.