आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेशिस्त रिक्षाचालकांना पाेलिसांचा दणका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - १५० बेशिस्त रिक्षाचालकांसह रिक्षामालकांवर वाहतूक पाेलिस शाखेने दंडात्मक कारवाई करीत कागदपत्रे बाळगणाऱ्या चालकांच्या ५० रिक्षा जमा केल्या. शहरातील बिघडलेली वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी प्रभावी नियोजन केले आहे. या नियोजनाप्रमाणे बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. निनावी तक्रारींसह राजकीय संघटनांनीही पोलिस आयुक्तांना वेळाेवेळी निवेदन दिले आहे. रस्ते सुरक्षा अभियानामध्येही रिक्षाचालकांकडूनच वाहतूक नियमांचे सर्वाधिक उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले. गणवेश नसणे, कागदपत्र जवळ बाळगणे, प्रवासी पळवणे, प्रवाशांशी उद्धटपणे वागणे अादी प्रकार वाढले हाेते. पोलिस उपआयुक्त विजय पाटील, वरिष्ठ निरीक्षक एम. ए. बागवान यांच्यासह सहायक निरीक्षक सुरेश भाले, प्रवीण कदम यांच्या पथकाने सीबीएस, रविवार कारंजा, शालिमार, नवीन सीबीएस, काठेगल्ली, द्वारका सर्कल, अंबड टी पॉइंट येथे १५० रिक्षाचालकांवर कारवाई केली. काळ्या-पिवळ्या खासगी वाहनांवर प्रथमच कारवाई करण्यात आली. मुंबई नाका, नवीन सीबीएस आणि द्वारका भागात रस्त्यावर उभ्या असलेल्या खासगी ट्रॅव्हल बसवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली.
‘कानात बाळी आणि स्टेअरिंगवर झोळी’ रडारवर
शहरात अनेक रिक्षाचालकांच्या कानात बाळी आणि स्टेअरिंगवर झोळी लावलेली असते. या टवाळखोर चालकांकडून वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी प्राप्त आहेत. आयुक्तांच्या आदेशानुसार दिवसभरात अशा ५० बेशिस्त रिक्षा जमा करण्यात आल्या.

साध्या वेशात कारवाई
वाहतूक शाखेचे अधिकारी प्रवीण कदम यांनी साध्या वेशामध्ये पायी चालत बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई केली. वाहतूक शाखेने प्रथमच इतक्या व्यापक प्रमाणात बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई सुरू केली आहे. अनेक रिक्षाचालकांनी या कारवाईचा धसका घेत रिक्षाच बाहेर काढल्या नाहीत. दुपारी रविवार कारंजा येथे रिक्षांची संख्या रोडावली होती. या कारवाईचे नागरिकांसह व्यापाऱ्यांनी स्वागत केले आहे.