आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

452 बेशिस्त रिक्षाचालकांवर धडक कारवाई, 99 हजारांची दंडवसुली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - वाहतूक नियोजनाचा फज्जा उडवणाऱ्या शहरातील ४५२ बेशिस्त रिक्षाचालकांवर वाहतूक विभागाने धडक कारवाई करत ९९ हजार ६०० रुपये दंड वसूल केला. वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी वाहतूक विभागाकडून ही धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. रिक्षाचालकांकडून वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे पोलिस आयुक्तांच्या निदर्शनास आले होते. वाहतूक शाखेला आदेश देत धडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. 
 
शहराच्या बिघडलेल्या वाहतूक व्यवस्थेत सुधार करण्यासाठी पोलिस आयुक्तांनी पुढाकार घेत वाहतूक विभागाला आदेश देत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांसह विशेषत: रिक्षाचालकांवर धडक कारवाई करण्यात येत आहे. वाहतूक शाखेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मंगळवारी विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत ४५२ बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई केली. कारवाईत ९९ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. शहराच्या बिघडलेल्या वाहतूक व्यवस्थेला बेशिस्त रिक्षाचालक सर्वाधिक जबाबदार आहेत. काही दिवसांपूर्वीच पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी शहर परिसरात पाहणी केली. यामध्ये रिक्षाचालकांकडून सर्वाधिक वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. रिक्षाचालकांकडून सिग्नल जंप करणे, फ्रंट सीट बसवणे, गणवेश नसणे, बॅज बिल्ला नसणे, परवाना नसणे, कालबाह्य रिक्षा चालवणे आदी वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात अाहे. 
 
सर्वाधिक बेशिस्त रिक्षाचालक रविवार कारंजा, सीबीएस, शालिमार आणि गंगापूररोड या परिसरात असल्याने येथे धडक कारवाई राबवण्यात आली. सहायक आयुक्त जयंत बजबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी पहिल्याच दिवशी ही धडक कारवाई केली. ही कारवाई पुढेही सुरूच राहणार असल्याचे बजबळे यांनी सांगितले. 
 

नियम पाळा, कारवाई टाळा 
रिक्षाचालक वाहतूक नियमांचे पालन करत नसल्याचे निदर्शनास आले आहे. काही नागरिकांच्या तक्रारी आल्या आहेत. या अनुषंगाने बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात येत आहे. रिक्षाचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, दंडात्मक कारवाई टाळावी. -जयंत बजबळे, सहायक आयुक्त, वाहतूक विभाग 
बातम्या आणखी आहेत...