आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा न्यायालयात कामकाजादरम्यान चॅटिंग केल्यास कारवाई, जिल्हा सत्र न्यायाधीशांचे अादेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - जिल्हा सत्र न्यायालयाच्या विविध न्यायालयांमध्ये कामकाज सुरू असताना पक्षकारांना माेबाईल वापराची मनाई असली तरी त्याच कालावधीत कर्मचारी, शिपाई-पहारेकरी माेबाइलवर चॅटिंग करताना अाढळले तर यापुढे त्यांच्यावर तत्काळ शिस्तभंगाची कारवाई करण्याचे अादेश प्रमुख जिल्हा न्यायाधीशांनी दिले अाहेत. यासंदर्भात परिपत्रक काढण्यात अाले असून त्याच्या अंमलबजावणीचे अादेश न्यायिक अधिकाऱ्यांसह वरिष्ठ न्यायालयीन व्यवस्थापकांना देण्यात अाले अाहेत. 
 
जिल्ह्याच्या प्रमुख न्यायाधीशपदाची सूत्रे सूर्यकांत शिंदे यांनी स्वीकारल्यापासून अनेक महत्त्वपूर्ण बदल न्यायालयीन कामकाजात दिसून येत अाहेत. गेल्याच महिन्यात न्या. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या जनजागृतीसाठी विविध शासकीय कार्यालये, पाेलिस ठाण्यांमध्ये कार्यक्रम घेण्यात अाले. यापाठाेपाठ नुकतेच उच्च न्यायालयाच्या अादेशाचे तंताेतत पालन करीत कुटुंबकल्याण समिती स्थापन करण्यात अाली अाहे. अाता, न्यायालयीन कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी न्या. शिंदे यांनी प्रथमच अशा स्वरूपाचे परिपत्रक काढले अाहे. 
 
न्यायालयीन कामकाजाच्या वेळी पक्षकार, वकिलांना माेबाइलवर मनाई असताना कर्मचारी-शिपाई मात्र माेबाइलवर व्हाॅट‌्सअॅप ग्रुपवर चॅटिंग करताना दिसून येतात. तर काही कर्मचारी तासन‌्तास फेसबुकवरच व्यस्त असतात. यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम हाेऊन शासकीय कामकाजात खाेळंबा निर्माण हाेताे. बहुतांश कर्मचाऱ्यांचे पक्षकार अाणि वकिलांच्या प्रश्नांकडे लक्षच राहत नाही. न्यायाधीश पीठासनावर अाल्यावर त्यांच्या सूचनांकडेही माेबाईलच्या खेळामुळे दुर्लक्ष केले जाते. अशा अनेक गंभीर बाबी न्या. शिंदे यांच्या निदर्शनास अाल्या अाहेत. यावर उपाय म्हणून यापुढे न्यायालयीन अधिकाऱ्यांनी अचानक कर्मचाऱ्यांचे माेबाइल तपासावे, त्यात काेणी गेम खेळत, साेशल मीडियावर वेळ घालवत असल्याचे दिसल्यास त्यांच्यावर तत्काळ शिस्तभंगाची कारवाई करण्याचे अादेश देण्यात अाले अाहेत. 
 
अावश्यकता भासल्यास ‘सीडीअार’ही तपासणार 
संबंधितपीठासीन अधिकाऱ्यांनी त्यांच्या अास्थापनेवर कार्यरत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या माेबाइल क्रमांकाबाबची संपूर्ण माहिती सप्टेंबरपर्यंत विहित नमुन्यात भरून घेण्याच्याही सूचना केल्या अाहेत. यात, कर्मचाऱ्याचे नाव, त्याचे पदनाम, माेबाइल क्रमांक, सिमकार्डची कंपनी ही माहिती द्यावी लागणार अाहे. अावश्यकता भासल्यास संबंधित कर्मचाऱ्यांचे सीडीअार तपासून इतर माहिती मिळवणे शक्य हाेणार अाहे. त्याद्वारे दैनंदिन कामकाजात किती वेळ अनावश्यक चॅटिंगवर खर्ची केला हे तपासून त्याची शहानिशा करता येणार अाहे. कार्यालयीन शिस्तीसाठी या नियमांचे अावश्यक पालन करण्याच्या सूचनाही देण्यात अाल्या अाहेत. 
 
 
बातम्या आणखी आहेत...