आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोनशे वाहनांवर नाशिकमध्ये कारवाई

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या अवैध वाहतुकीबाबत ‘दिव्य मराठी’ने वृत्तमालिका प्रसिद्ध करताच पोलिस व प्रादेशिक परिवहन विभाग खडबडून जागा झाला. पोलिसांनी तीन दिवसांत दोनशेहून अधिक वाहनांविरुद्ध कारवाईसह मुख्याध्यापकांशी पत्रव्यवहार करून तातडीने पालकसभा बोलविण्याच्या सूचना दिल्या.

स्कूलबसबरोबरच रिक्षा, मॅजिक, मिनिडोअर, व्हॅन आदी वाहनांद्वारे विद्यार्थ्यांची वाहतूक करताना मोटार वाहन अधिनियमांचे उल्लंघन केले जात असल्यावर ‘दिव्य मराठी’ने प्रकाश टाकला होता. नियमित कारवाईत संबंधित वाहन जप्त करावे लागत असल्याने विद्यार्थ्यांच्या गैरसोयीकडे पोलिस व आरटीओकडून लक्ष वेधण्यात येत होते. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून पोलिसांनी कठोर कारवाई सुरू केली आहे.
शहरातील या भागात केली कारवाई - मध्यवर्ती बसस्थानक, अशोकस्तंभ, रविवार कारंजा, दिंडोरीरोड, गंगापूररोड, सरकारवाडा पोलिस ठाण्यासमोर, त्र्यंबकरोड भागात सकाळी 8 ते 10 आणि सायंकाळी 5 ते 6 च्या कालावधीत तब्बल 200 वाहनांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक 70 रिक्षांचा समावेश असून, 40 मॅजिक व मिनिडोअर रिक्षा तसेच व्हॅन, काळी-पिवळी जीप यांचा समावेश आहे.
वेगवेगळी 15 वाहने कारवाईत जप्त - विद्यार्थ्यांची नियमबाह्य व बेकायदेशीर वाहतूक करणार्‍या आठ रिक्षा व सात मारुती व्हॅन पोलिसांनी जप्त केल्या असून, संबंधित वाहनचालकांचे परवाने निलंबित करण्यासाठी आरटीओकडे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. कारवाई नियमित सुरू राहणार असून, शाळांच्या मुख्याध्यापकांना पत्र पाठविण्यात आले आहे. पालकांची सभा बोलावून केवळ पैशांच्या बचतीकडे न पाहता मुलांच्या सुरक्षित प्रवासाचा विचार करून सुरक्षित वाहतुकीबाबत जनजागृती करण्यात येत आहे. संदीप दिवाण, पोलिस उपआयुक्त