आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Action Taken On Fifty Heavy Vehicles On Service Road

डी. बी. स्टार इम्पॅक्ट: सर्व्हिसरोडवरील पन्नास अवजड वाहनांवर कारवाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सर्व्हिसरोडवर उभ्या केलेल्या वाहनांवर वाहतूक पोलिसांनी गुरुवारी कारवाई केली)
जुने नाशिक- महामार्गालगतच्या सव्हिर्सरोडवर अनधिकृतपणे अवजड वाहने लावली जात असल्याने वाहतूक कोंडीत भर पडत होती. या सर्व्हिसरोडवर उभ्या राहणाऱ्या वाहनांच्या विरोधात गुरुवारी वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला. या कारवाईत गरवारे पॉइंट ते तिगरानिया कॉर्नरपर्यंत सर्व्हिसरोडवर उभ्या करण्यात आलेल्या ५० वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
महामार्गालगतच्या सर्व्हिसरोडवर अवजड तसेच नादुरुस्त वाहने सर्रास उभी केली जातात. सर्व्हिसरोडवर उभ्या राहणाऱ्या या वाहनांमुळे वाहतूक कोंडी निर्माण होऊन दररोज छोट्या-मोठ्या अपघातांच्या घटना घडत होत्या. परिसरातील नागरिकांना तसेच वाहनधारकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत होता. गुरुवारी वाहतूक शाखेचे सहायक आयुक्त प्रशांत वाघुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शंकर कांबळे, निरीक्षक हनुमंत गाडे, जीवन चौधरी यांच्यासह वाहतूक कर्मचाऱ्यांनी थेट गरवारे पाइंट ते तिगरानिया कॉर्नरपर्यंत सर्व्हिसरोडवर उभ्या राहणाऱ्या वाहनांवर कारवाईचा बडगा उचलत ५० वाहनांवर दंडात्मक कारवाई केली.
वाहनधारकांना पुन्हा सर्व्हिसरोडवर वाहने लावण्याची ताकीद देण्यात आली. या कारवाईमुळे सर्व्हिसरोडने मोकळा श्वास घेतल्याने पादचारी वाहनधारकांकडून स्वागत करण्यात येत आहे.
वाहनधारकांची धावपळ
गरवारे पॉइंट ते तिगरानिया कॉर्नरपर्यंत वाहतूक पोलिसांच्या शाखेने गुरुवारी दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला. अचानक करण्यात आलेल्या या कारवाईमुळे सर्व्हिसरोडवर वाहने लावणाऱ्या वाहनधारकांची धावपळ झाली होती.

कारवाई सुरूच राहणार
- सर्व्हिसरोडवर वाहने उभी करून वाहतूक कोंडी निर्माण करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत ५० वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, ही मोहीम यापुढेही सुरूच राहणार आहे.
हनुमंत गाढे, पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा