आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोदावरीत ढिगारा टाकणारी जीप महापौरांनी पकडली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- चोपडा लॉन्सनजीक गोदावरी नदीत तोडलेल्या बांधकामाचा ढिगारा टाकणाऱ्या एका बांधकाम व्यावसायिकाची जीप महापौर अशोक मुर्तडक यांनी स्वत:च पकडून जप्त करीत महापालिकेच्या बांधकाम विभागाला शुक्रवारी चांगलाच दणका दिला. यापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वारंवार सूचना देऊन नदीच नव्हे, तर शहरही अस्वच्छ करणाऱ्या ढिगाऱ्याविरोधात कडक मोहिमेचे आदेश दिले होते. मात्र, महापालिका प्रशासन त्याचे पालन करण्यासाठी पुढे सरसावत नव्हते.
नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू असून, जुनी बांधकामे तोडल्यानंतर निर्माण होणारा ढिगारा वा खराब साहित्य जेथे जागा मिळेल तेथे टाकण्याचे प्रकार सुरू आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शहराचे सौंदर्य आरोग्य धोक्यात येत असल्याची चिंता व्यक्त करीत ढिगारा टाकणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले होते. प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नव्हती. ढिगारा टाकायचा कोठे, याची ठिकाणे निश्चित करण्यापासून तर दंडात्मक कारवाई कोणाच्या अधिकारात करायची, यावर खल सुरू होता. दरम्यान, शुक्रवारी दुपारी महापालिकेत येत असताना मुर्तडक यांना चोपडा लॉन्सनजीक एक जीप दिसली. या जीपमधून कामगार मलबा उतरवत होते. गेल्याच आठवड्यात नाशिककरांनी स्वच्छता मोहीम राबवून गोदावरीतील घाण साफ केली होती. असे असतानाही ढिगारा टाकून नदीपात्र अरुंद करण्याचा प्रकार सुरू असल्याचे बघून महापौरांनी तातडीने जीपनजीक धाव घेतली. चालकाला विचारणा केल्यानंतर त्याने एका बांधकाम व्यावसायिकाच्या साइटवरून ढिगारा आणल्याचे कबूल केले. त्यानंतर महापौरांनी तातडीने बांधकाम विभागाचे शहर अभियंता सुनील खुने यांना दूरध्वनी करून जीप जप्त करून दंडात्मक कारवाईचे आदेश दिले.
पथके करण्याच्या सूचना
शहरात अस्वच्छता पसरवणाऱ्यांवर कारवाईसाठी विभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पथके तयार करण्याचे आदेश महापौरांनी दिले. त्यासाठी भरारी पथके तयार करून कारवाई करा कोणाचाही दबाव बाळगू नका, असेही स्पष्ट केले.
फौजदारी कारवाईचे आदेश
महापालिकेत पोहोचल्यानंतर महापौर मुर्तडक यांनी खुने, तसेच उपायुक्त रोहिदास बहिरम यांच्याशी संपर्क साधला. शहरात ठिकठिकाणी ढिगारा टाकणाऱ्यां विरोधात फौजदारी कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले. ढिगारा टाकण्याची जबाबदारी संबंधितांची असून, महापालिकेमार्फत मदत म्हणून ढिगारा टाकण्यासाठी काही जागाही निश्चित करून देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
यापुढे कठोर कारवाई
- गोदापात्रात ढिगारा टाकणाऱ्यां विरोधात यापुढे कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. शहरातही घाण टाकण्याचा प्रयत्न केला, तर दंडात्मक कारवाई होईल. शहर स्वच्छ ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.
अशोक मुर्तडक, महापौर