आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Actress Supriya Vinod And Actor Sandip Pathak In Nashik

प्रादेशिक चित्रपटासाठी हवी मल्टिप्लेक्सची एक स्क्रीन राखीव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - ‘मराठीत चांगले व हिट ठरणारे चित्रपट येत असल्याने, मल्टिप्लेक्समधील एक स्क्रीन प्रादेशिक चित्रपटांसाठी राखीव ठेवण्यात यावी, तसे झाले तरच रसिकांना चांगले मराठी चित्रपट पाहता येतील,’ असे मत प्रसिद्ध अभिनेत्री व प्रख्यात लेखक रत्नाकर मतकरी यांची कन्या सुप्रिया विनोद यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केले.

येत्या 20 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार्‍या ‘इन्व्हेस्टमेंट’ या रत्नाकर मतकरी लिखित चित्रपटाच्या निमित्ताने सुप्रिया आणि अभिनेता संदीप पाठक यांनी ‘दिव्य मराठी’च्या कार्यालयास भेट दिली. या वेळी सुप्रिया यांच्यासह संदीप यांनीही चित्रपटाबद्दल, तसेच मराठी चित्रपटसृष्टीबद्दल मनमोकळा संवाद साधला.

चित्रपटात सुप्रिया या तुषार दळवी यांच्या पत्नीची व प्रहर्ष नाईक या बालकलाकाराच्या आईच्या भूमिकेत आहेत. संदीप गांगण या एका सर्वसाधारण मध्यमवर्गीय कुटुंबातील भूमिकेत आहेत. गणेश मतकरी दिग्दर्शित ‘इन्व्हेस्टमेंट’ हा चित्रपट न्यूयॉर्क फिल्म फेस्टिव्हल, र्जमनी येथील स्टुटगार्ड फिल्म फेस्टिव्हल अशा विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये गाजला आहे. दररोज आपल्या महत्त्वाकांक्षांसाठी झगडणार्‍या आणि आपल्या मुलांसाठी प्रगतीची चुकीची व्याख्या करत झटणार्‍या पालकांची कथा असलेला हा चित्रपट आहे, असे सांगताना सुप्रिया यांनी चित्रपटाच्या ‘जे काही करतोय ते मुलांसाठीच ना’ या टॅगलाइनचा खरा अर्थ उलगडून सांगितला.

त्या म्हणाल्या की, ‘जे काही मुलांसाठी करतो आहोत त्यात त्यांचे भवितव्य सुरक्षित आहे का, त्यांना ते म्हणतील ते सगळे देताना ती बिघडत तर नाहीत ना, याचा विचार न करता मुलांसाठीच जे काही करतो त्यामागे स्वत:शीच अप्रामाणिक राहण्याची भावना आहे.’

मतकरींचे दोन सिनेमे लिहून तयार
वयाच्या 75व्या वर्षी इन्व्हेस्टमेंट चित्रपट काढल्यानंतर रत्नाकर मतकरी यांचे दोन सिनेमे लिहून तयार आहेत. केवळ योग्य निर्मात्यांचा शोध सुरू आहे. सुप्रिया यांचा ‘यशवंतराव’ हा जब्बार पटेल दिग्दर्शित चित्रपट आगामी काळात येतो आहे, तर संदीप यांचा श्रीकांत बोजेवार लिखित ‘एक हजाराची नोट’ हा विदर्भातील परिस्थितीवर आधारित चित्रपट येतो आहे. एकूणच भविष्यातील ‘इन्व्हेस्टमेंट’ या दोन्ही कलाकारांनी प्रेक्षकांसाठी राखून ठेवली आहे.

‘डिजिटलाइज्ड सिनेमा’
‘स्टॅनली का डिब्बा’ बनवणारा सिनेमॅटोग्राफर अमोल गोळे याने हा चित्रपट डिजिटल कॅमेर्‍यावर बनविला आहे. याबद्दल एक अनुभव सांगताना सुप्रिया म्हणाल्या की, ‘अमोलला एक सीन सोळाव्या मजल्यावर घ्यायचा होता. डिजिटल कॅमेर्‍याला इतके उंच पॅराफिट नसते. त्यामुळे त्याने इतक्या उंचीवर कठड्यावर उभा राहून तो सीन लाइट अँडजस्ट करत चित्रित केला.’ हा अनुभव अत्यंत थरारक होता, असेही त्यांनी सांगितले.