आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांनी मोकळं हसायला शिकावं! अभिनेत्री वंदना गुप्ते यांचा मुक्त संवाद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - ‘महिला अगदी तोंडाला हात लावून बळंबळं हसल्यासारखं करतात. टाळ्याही जोरात वाजवत नाहीत, म्हणूनच मला विनोदी नाटक करायला आवडतं,’ असं सांगत प्रसिद्ध अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी नाशिककर महिलांशी खुमासदार शैलीत दिलखुलास संवाद साधला. निमित्त होते ‘दिव्य मराठी’च्या मधुरिमा क्लबतर्फे शंकराचार्य संकुलात आयोजित ‘ती’चं आकाश या कार्यक्रमाचे. उत्तरा मोने यांनी संवादाचा सेतू बांधला.
बहिणीच्या पतीचे निधन झाले तेव्हा प्रयोगादरम्यान अंत्यविधीला जाऊन येत विनोदी नाटकाच्या केलेल्या कसरतीच्या प्रसंगातून कलाकाराचा मानसिक संघर्ष मांडून गुप्ते म्हणाल्या,‘ माणिक वर्मा यांची मुलगी म्हणून मी गायिका होईन, असा सर्वांचा अंदाज होता. तसे झाले नाही. मात्र, गाण्यामुळेच अभिनयाची संधी मिळाली. सुलभा देशपांडे आम्हाला शिक्षिका होत्या. त्यांनी एका कार्यक्रमात लावणी गायला लावली व त्यानंतर पद्मर्शी धुंडीराज या नाटकात ब्रेक मिळाला.’
‘अखेरचा सवाल’च्या परदेशातील प्रयोगाच्या वेळी घरी असलेल्या साडेतीन वर्षांच्या मुलीचे टेप केलेले हुंकार रेकॉर्डरवर ऐकून रडताना दया डोंगरे, विजयाबाई, अरुण जोगळेकरांनाही त्यांच्या मुलांची आठवण येऊन रडू यायचं, अशी हेलावून टाकणारी आठवण त्यांनी सांगितली.
विदर्भात वसंत कानेटकरांच्या ‘गगनभेदी’च्या प्रयोगादरम्यान ताप चढला, खोकल्यातून रक्त पडले, तेव्हा नाइलाजास्तव प्रयोग रद्द केला. याच नाटकाच्या कोकणातील प्रयोगादरम्यान यशवंत दत्त यांच्या पाठीवर झुरळ दिसले. सगळा संवाद विसरले. झुरळ जाईना अन् मी बोलेना. दत्तांनीच पुन्हापुन्हा माझेच संवाद फिरवून फिरवून म्हटले, हा किस्सा ऐकून एकच खसखस पिकली.
‘फॅन्सी ड्रेस स्पर्धेसाठी मुलांची तयारी करून देताना त्यांच्या ‘ममा तू नसशीलच ना?’ या प्रश्नाने माझ्या प्रायोरिटीज नक्की कोणत्या, असा प्रश्न पडला आणि मग पुन्हा घर व नाटक बॅलन्स करायचा प्रयत्न केला. आज मुले खूश आहेत. मुलीला मुलगा झाल्याने आजी होण्याचे सुखही अनुभवतेय,’ अशा भावना गुप्ते यांनी व्यक्त केल्या.
यावेळी दैनिक ‘दिव्य मराठी’चे बिझनेस हेड निशित जैन, युनिट हेड मदनसिंग परदेशी, पंकज पिसोळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. मधुरिमा क्लबच्या वृषाली घाटणेकर यांनी क्लबची भूमिका मांडली.
‘पाडाला पिकलाय आंबा’ अन् महिलांची दाद
‘पाडाला पिकलाय आंबा’ हे गाणे गाताना त्यांनी महिलांना टाळ्यांचा ताल धरायला लावला. ‘सात पावलांतूनी मी आज विश्व जिंकिले’ हे माणिकबाईंचे गाणे गाऊन आईच्या आठवणी जागवल्या, तसेच ‘घननीळा लडिवाळा झुलवू नको हिंदोळा’ हे आपल्या आवडीचे गाणे गाऊन दाद मिळवली.