आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीय खेळाडूने दिला अखेर व्यसनाला ‘खो’ निर्धार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- कॅलेंडरवर ‘डिसेंबर थर्टी फस्र्ट’ दिसू लागले की तयारी सुरू होते पाटर्य़ांची. चिअर्सच्या जल्लोषात डिस्कोथेकमध्ये थिरकणारी पावले डोळ्यासमोर येतात अन् मग रात्र ‘धुंद’ करण्याच्या गप्पा सुरू होतात. पण, सावधान! याच धुंदीत अनेकांच्या आयुष्याची राखरांगोळी झालीय. कोणी जीव गमावलाय, तर कोणी जीवनसाथी. कोणा व्यावसायिकाला याच नशेने देशोधडीला लावलंय, तर कोणाला जडलाय दुर्धर आजार. त्यातल्याच निवडक पाच तरुणांनी व्यसनातून स्वत:ची सुटका करून बदललेल्या जीवन प्रवासाची गाथा ‘थर्टी फस्र्ट’निमित्त आजपासून..
नाशिकमधील प्रतिष्ठित आणि उच्चशिक्षित कुटुंबाची पार्श्वभूमी असलेला तरुण. उमेदीच्या काळात राष्ट्रीय स्तरावरील खो-खोचा खेळाडू. तेविसाव्या वर्षी बिअरमध्ये पाणी टाकून ‘पिण्या’ला आपलंसं करणार्‍या नीलेशला पुढे याच मद्यानं कसं गिळंकृत केलं, हे कळलंही नाही. कॉलेजरोडवर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू विक्री दुकानाएवढाच भलामोठा त्याचा अहं. ‘पैसा मी कमवतो म्हणजे माझ्या पद्धतीने उडवूही शकतो,’ या तत्त्वावर विश्वास. दारूची नशा वाढत गेली. खिशातल्या पैशाला पाय फुटले. ते कधी डान्सबारकडेही वळाले. 15 वर्षे उरावर बसलेल्या नशेने अखेर तिचे ‘गुण’ दाखवले आणि हा खेळाडू अँडिक्शन अर्थात, व्यसनाधीनतेच्या कचाट्यात सापडला. जिवलग मित्र विनोद शाह व मंदार राजेंद्र यांनी मुंबईच्या डॉ. युसूफ र्मचंट यांच्याकडे त्याला नेले. वर्षभर नीलेशने तेथे नियोजित कार्यक्रम पूर्ण केला. या काळात दारू तर सुटलीच, शिवाय सायकोथेरपीचे ज्ञानही वाढले. या ज्ञानाचा उपयोग जेव्हा कौशल्यात केला, तेव्हा अन्य रुग्णांनाही नीलेशची भाषा समजायला लागली. तेही नीलेशचं ऐकून व्यसनांपासून दूर जाऊ लागले. या कामाची निकड लक्षात आल्यावर नीलेशने चार वर्षांपूर्वी नाशिकमधील हिंदुस्थाननगर परिसरात लाइफ रिहॅबिलिटेशन सेंटर सुरू केले. 30-35 रुग्ण तेथून पूर्णत: बरे होऊन आता आपापल्या घरी गेले आहेत.