आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Adesh Bandekar News In Marathi, Shiv Sena, Divya Marathi, Nashik

होम मिनिस्टर्स’ची गर्दी भाऊजींसाठी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - शिवसेनेचे स्टार प्रचारक तथा ‘होम मिनिस्टर’ (भाऊजी) फेम आदेश बांदेकर यांच्या उपस्थितीत महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ अशोकस्तंभापासून बांदेकर यांच्या उपस्थितीत पिंपळपारापर्यंत रॅली काढण्यात आली. अनेक महिलांना या रॅलीशी काहीही देणे-घेणे नाही, असे दाखवत केवळ भाऊजींना पाहावे, औक्षण करावं आणि आमच्याही घरी या.. असे निमंत्रण द्यावे यासाठी एकच गर्दी झाली होती.


अशोकस्तंभ येथील ढोल्या गणपतीचे दर्शन घेऊन बांदेकर यांनी रॅलीला प्रारंभ केला. या वेळी गोदावरीनगर, मल्हार गेट पोलिस चौकी, रेडक्रॉस, घनकर लेन, गंगावाडी, सुंदरनारायण मंदिर, गोरेराम लेन, चांदीचा गणपती, सराफ बाजार, दहीपूल, मेनरोड, बोहरपट्टी, गाडगे महाराज पुतळा, पिंपळचौक असे मार्गक्रमण केले. या वेळी लाडक्या भाऊजींना बघण्यासाठी महिला आणि तरुणी मोठय़ा संख्येने रस्त्याच्या दुतर्फा उभ्या होत्या. काही ठिकाणी बांदेकर यांचे औक्षण करण्यात आले. रॅलीत उमेदवार हेमंत गोडसे, महानगरप्रमुख अजय बोरस्ते, उपमहापौर सतीश कुलकर्णी, विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर, भाजपचे शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी, विजय साने, गिरीश पालवे, पवन क्षीरसागर, विजय देवरे आदींनी सहभाग घेतला होता.


नाशिकला झालेल्या रॅलीपूर्वी आदेश बांदेकर यांच्या उपस्थितीत त्र्यंबकेश्वर येथून प्रचारफेरी काढण्यात आली. या वेळी त्र्यंबकेश्वर मंदिरात अभिषेक करण्यात आला. या वेळी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विजय करंजकर, माजी महापौर विनायक पांडे आदी उपस्थित होते. मंदिर चौक, पाच आळी, मेनरोड, तेलीगल्ली, पाटील गल्ली येथून रॅलीने मार्गक्रमण केले. या वेळी बांदेकर यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. रॅलीत सेनेचे शहराध्यक्ष भूषण अडसरे, तालुकाध्यक्ष लक्ष्मीकांत थेटे आदींनी सहभाग घेतला.


दरम्यान, महायुतीच्या रॅलीला 5 वाजेपासून अशोकस्तंभ येथून सुरुवात होणार होती. प्रत्यक्षात बांदेकर हे 6 वाजता आले. तोपर्यंत शिवसेना, भाजप आणि रिपाइंचे पदाधिकारी सुमारे एक तास उभे होते. त्यामुळे वाहतुकीला खोळंबा होत होता. बांदेकर यांचे आगमन झाल्यानंतर वाहतूक थांबविण्यात आली. त्यामुळे खोळंब्यात अधिक वाढ झाली.