आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपंग - आजारी बालकांना मिळू लागले हक्काचे घर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - आधाराश्रमातील बालकांना दत्तक घेण्यासाठी नेहमीप्रमाणे सध्यादेखील तब्बल शंभरहून अधिक पालक ‘वेटिंग लिस्ट’वर आहेत. मात्र, प्रत्येक पालकाला सुदृढ - निरोगी बालकच हवे असणे साहजिक असल्याने अशा प्रकारची बालकेच दत्तक घेतली जातात. मात्र, अल्पसे व्यंग किंवा थोड्याफार काळजीने बरा होऊ शकणारा आजार असलेल्या बालकांनादेखील हक्काचे आई-बाबा मिळावेत, यासाठी आधाराश्रमाकडून विशेष प्रयास केले जात असून, त्याला विदेशातून प्रतिसाद मिळू लागला आहे.

आधाराश्रमात सध्या एकूण 145 मुले - मुली राहात असले तरी त्यातील दत्तक देण्यासाठी (लीगली - मेडिकली फ्री ) सर्वार्थाने योग्य असलेल्या 0 ते 6 वयोगटातील बालकांची संख्या सध्या 30 आहे. या बालकांना दत्तक घेण्यासाठी सध्या सुमारे 100 हून अधिक माता - पित्यांचे अर्ज आधाराश्रमाकडे प्राप्त झाले आहेत. त्यामुळे त्यातील किमान 70 माता - पित्यांना तरी दत्तक विधानासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे किंवा अन्यत्र प्रयास करावे लागणार आहेत. अशाप्रकारे दत्तक घेण्यापासून कायमचे वंचित राहण्याची वेळदेखील अनेक दांपत्यांवर येऊन जाते. त्यामुळे वंचित राहण्यापेक्षा अल्पसे व्यंग किंवा थोड्याफार काळजीने बरा होऊ शकणारा आजार असलेल्या बालकांनादेखील दत्तक घेण्याबाबत आधाराश्रमाकडून विशेष प्रयास केले जात असून, त्याला विदेशातील समजूतदार जोडप्यांकडून हळूहळू प्रतिसाद लाभत आहे.

भारतीय पालकांनीही घ्यावा पुढाकार
अल्पसे व्यंग किंवा किरकोळ आजारपण असलेल्या बालकांबाबत आपल्या देशातील पालकांनीदेखील दत्तक घेण्याबाबत पुढाकार घ्यायला हवा. आपल्याला अपत्य मिळाल्याच्या आनंदाइतकेच त्या बालक किंवा बालिकेला हक्काचे आई- बाबा मिळाल्यास त्याच्यातील उणिवांवर ते नक्कीच मात करू शकते. हा विचार मनात ठेवून त्यांना दत्तक घेण्याबाबतही थोडा सकारात्मक विचार करून त्यांना आपलेसे करण्याची गरज आहे. प्रा. निशा पाटील, सचिव, आधाराश्रम

एक आजारी बालक ठरले नशिबवान
आधारार्शमातील एका- दोन वर्षाच्या मुलाला आतड्याचा आजार होता. त्याच्यावर त्याबाबतचे उपचारही करण्यात आले. दरम्यानच्या काळात त्याच्याबद्दलची माहिती नेटवरून प्रसिद्ध करून त्याला पालकत्व मिळण्याबाबत आवाहन केल्यानंतर त्याला विदेशातून एका दांपत्याने दत्तक घेण्याबाबत पुढाकार घेतला आहे. लवकरच ते पालक नाशिकमध्ये येऊन त्याला घेऊन तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करणार आहेत.

हे आजार ठरतात अडचणीचे
जन्माच्या वेळचे कमी वजन, थॅलेसेमिया, थायरॉईड यासह अन्य काही किरकोळ आजार असलेल्या बालकांना दत्तक घेण्यात कोणताच अडथळा यायला नको. मात्र, केवळ आजारांची नावे बघूनच त्या मुलांना दत्तक घेण्याचा विचारदेखील पालक करीत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळेच या बालकांचा प्रश्न नेहमीच अधिकाधिक बिकट बनत जातो.