नाशिक - आधाराश्रम सारख्यासंस्थांमध्ये अनाथ बालकांची वाढणारी संख्या चिंताजनक असल्याचे सांगत कारा ( सेंट्रल अॅडॉप्शन रिसर्च ऑथेरिटी ) ने आता
आपल्या मार्गदर्शन सूचनांमध्ये कमालीचा मोठा बदल करण्याचे सुतोवाच केले आहेत. अडॉप्शनला अधिकाधिक चालना देण्यासाठी ऑनलाईन पद्धतीचा अवलंब करण्यात येणार असून त्यासाठी चार महिन्यांचा कालावधी देखील निश्चित करून दिला जाणार आहे.
भारतात सुमारे ५० हजारांपेक्षा अधिक बालक अनाथ असल्याचा धक्कादायक अहवाल दिल्ली येथे महिला आणि बाल विकास मंत्री मेनका गांधी यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीतून पुढे आला. दरवर्षी ८०० ते एक हजार बालकांनाच अडॉप्ट केले जाते. उर्वरित बालके घराच्या प्रतीक्षेत संस्थेतच मोठी होत असल्याचे मेनका गांधी यांनी यावेळी सांगितले. संस्थेत दाखल झालेले अनाथ बालकाचे तीन वर्षाच्या आत दत्तक दिले गेलेच पाहिजे अशा विचाराने गांधी यांनी मार्गदर्शक सूचनांमध्ये मोठे बदल करण्यात येणार असल्याची माहिती दिली. यंदा किमान पंधरा हजार मुले दत्तक दिली जावीत असे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
अशी होईल ऑनलाईन प्रक्रिया
प्रत्येकपालकाने अडॉप्शनसाठी आपले पोर्टल तयार करावे. नोंदणीच्या वेळीच असे पोर्टल तयार करण्यात येईल. नोंदणी अर्जातच अपेक्षीत बालकाचे वर्णन असेल. त्यानुसार इंटरनेटवर भारतातील सहा मुलांचे फोटो टाकण्यात येतील.यातील दोन मुलांची निवड ४८ तासांच्या आत करावयाची आहे. पुढच्या पंधरा दिवसाच्या आत एका मुलाची निवड करुन अॅडॉप्शनची प्रक्रिया पूर्ण होईल.
टाळाटाळ केल्यास संस्था बंद
दत्तकप्रक्रिया अधिक प्रभावीपणे आणि गतीने राबविण्यासाठी कारा आणि महिला बालकल्याण विकास मंत्रालयाला संबंधित संस्था महिन्याला अहवाल सादर करतील. त्याचप्रमाणे ज्या संस्था मुले उपलब्ध असतानाही दत्तक देण्यास नकार देत असतील अशा संस्था तातडीने बंद करण्यात येणार आहेत. दत्तक देण्यास टाळाटाळ करणार्या कर्मचार्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.