आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंबडमध्ये साकारणार अत्याधुनिक ट्रक टर्मिनस, 6 कोटींचा प्रस्ताव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- अंबड औद्योगिक वसाहतीत अत्याधुनिक ट्रक टर्मिनस साकारण्यात येणार असून, 21 हजार 500 चौरस मीटरच्या सुविधा भूखंडाचा त्यासाठी वापर केला जाणार आहे. या प्रकल्पाला राज्य सरकारकडून तत्त्वत: मान्यता दिली असून, सहा कोटी रुपयांचा निधी त्यासाठी प्रास्तावित करण्यात आलेला आहे.

या प्रकल्पाबाबत निमा (नाशिक इंडस्ट्रीज् अँण्ड मॅन्युफॅर्स असोसिएशनच्या) पदाधिकार्‍यांसह नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या शिष्टमंडळाने एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी रामदास खेडकर यांच्यासह अधिकार्‍यांशी चर्चा केली.

अंबड एमआयडीसीतील भूखंड क्रमांक 43 वर हा प्रकल्प उभारला जाणार असून, या ट्रक टर्मिनसमध्ये हलकी व जड वाहने पार्किंगसाठी स्वतंत्र व्यवस्था असेल. वाहतूकदार आणि चालक-वाहकांसाठी रेस्टॉरंट, आरोग्यकेंद्र, सुलभ शौचालये, एटीएम केंद्रे, बँक शाखा यांसारख्या सुविधा उपलब्ध असतील. टर्मिनसमध्येच वाहतूकदारांसाठी गाळे असावेत, अशी मागणी ट्रान्सपोर्टर्स असोसिएशनकडून करण्यात आली. त्यावर एमआयडीसीचे सचिव बोधरे यांनी कार्यकारी अभियंत्यांना अशी व्यवस्था करण्याच्या सूचना केल्या.

पुढील वर्षापर्यंत ट्रक टर्मिनसचे काम पूर्ण करण्यात येणार असून, त्यानंतरच ते भाडेतत्त्वावर लिलाव पद्धतीने चालविण्यास दिले जाणार आहे. यावेळी उद्योजकांच्या संघटनेला प्राधान्य दिले जाणार असल्याचे बोधरे यांनी स्पष्ट केले. अधिकार्‍यांना भेटलेल्या शिष्टमंडळात निमाचे अध्यक्ष मनीष कोठारी, सरचिटणीस मंगेश पाटणकर, पायाभूत सुविधा उपसमितीचे व्हीनस वाणी, ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष अंजुम सिंघल, अवतार सिंग, सुनील बुरड आदी होते.

टर्मिनसची खास वैशिष्ट्ये
भूखंड क्रमांक 43 वर हा प्रकल्प उभारला जाणार
वाहतूकदार आणि चालक तसेच वाहकांसाठी सर्व नागरी आणि वाहतूक सुविधांचा प्रस्ताव
गाळे काढण्याचाही विचार
पुढील वर्षापर्यंत काम पूर्ण होणार