आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Advanced Medical Technology For Heart Disease, Latest News In Divya Marathi

"अत्याधुनिक तंत्रज्ञान' हृदय रुग्णांसाठी वरदान, राष्ट्रीय चर्चासत्रात तज्ज्ञांनी व्यक्त केला विश्वास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान, प्रभावी औषधे आणि भूल देण्याचे सुधारित तंत्र या त्रिसूत्रीमुळे हृदयविकाराचे रुग्ण फास्ट ट्रॅक सर्जरीकडे वळत आहेत. यापूर्वी हृदय शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला १० दिवस रुग्णालयात थांबावे लागत होते. मात्र, या नवीन पद्धतीमुळे पाचव्या दिवशी रुग्णाला घरी सोडता येते, असा विश्वास वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला.
जागतिक हृदय दिनानिमित्त मॅग्नम हार्ट इन्स्टिट्यूटतर्फे महाकवी कालिदास कलामंदिर येथे ह्यआपल्या हृदयाचं एेकाह्ण हे राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. व्यासपीठावर योगातज्ज्ञ तथा हृदयरोगतज्ज्ञ डॉ. जगदीश हिरेमठ, डॉ. मनोज नाईक, मॅग्नम हार्ट इन्स्टिट्यूटचे डॉ. मनोज चोपडा, डॉ. सुनील संकलेचा उपस्थित होते. "हृदय शस्त्रक्रियेनंतर कमीत कमी दिवसांत रुग्णाला घरी सोडता यावे यासाठी "फास्ट ट्रॅक सर्जरी' ही पद्धत अलीकडच्या काळात विकसित झाली आहे. नवीन प्रभावी औषधे, शस्त्रक्रियेच्या तंत्रातील बदलामुळे ही पद्धत विकसित करणे शक्य झाले आहे. तसेच, "रक्ताविना शस्त्रक्रिया' ही शस्त्रक्रियेची नवी पद्धतीही पुढे येत असून, त्यामुळे रुग्णाला कमीत कमी रक्त द्यावे लागेल, अशी माहिती डॉ. हिरेमठ यांनी दिली. यंत्रमानवाद्वारेही आता हृदय शस्त्रक्रिया होत आहेत. परदेशात या पद्धतीने शस्त्रक्रिया सुरू झाल्या आहेत. त्या तुलनेत भारतात मात्र हे प्रमाण अद्याप कमी आहे. या पद्धतीत वेळ व खर्चही अधिक येतो. शस्त्रक्रिया कक्षाच्या बाहेर बसून डॉक्टर यंत्रमानवाला नियंत्रित करत असतात. अशा प्रकारच्या शस्त्रक्रियेत शरीराला खूपच कमी छेद द्यावे लागतात. त्यामुळे शस्त्रक्रियेनंतर अगदी दुसऱ्या दिवशीही रुग्णाला घरी जाता येते, असे डॉ. हिरेमठ यांनी सांगितले.
समतोल आहार हवा
नियमित व्यायाम व योगासन समतोल आहार घेऊन शारीरिक तंदुरुस्तीवर लक्ष दिल्यास हृदयविकार टाळता येऊ शकतो, असे मत डॉ. मनोज नाईक यांनी व्यक्त केले. डॉ. नाईक म्हणाले की, तरुणाई व्यसनाधीनतेच्या आहारी गेल्यामुळे तिशीतल्या व्यक्तीलाही हृदयाचे विकार होऊ लागले आहेत. मानसिक स्वास्थ्य चांगले ठेवल्यास हृदयविकाराचे प्रमाण कमी होऊ शकते.