आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Advertise Nine fold Increase In The Maximum Rate Of NMC

महापालिकेच्या जाहिरात दरात कमाल नऊपट वाढ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक-होर्डिंग्जमुळे होणारे विद्रुपीकरण थांबवण्याबरोबरच महापालिकेचे आर्थिक उत्पन्न वाढून अनधिकृत जाहिरातबाजीला आळा बसण्यासाठी बुधवारी महासभेत ‘बाह्य जाहिरात व आकाशचिन्ह धोरणा’स मंजुरी देण्यात आली. या धोरणानुसार नवीन दर किमान चार ते नऊ पटीने वाढले आहेत. हा प्रस्ताव तत्काळ राज्य शासनाकडे सादर करण्याचे आदेश महापौर अँड. यतिन वाघ यांनी दिले.
सत्ताधारी मनसे, भाजपने याला सर्मथन दिले, तर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी व शहर विकास आघाडीने त्यातील त्रुटी दाखवत विषय तहकूब करून सुधारणेची सूचना केली. दरवर्षी जाहिरातीतून तीन कोटींचे उत्पन्न अपेक्षित असताना कर विभाग 75 ते 80 लाख इतकीच वसुली करीत असल्याचे नगरसेवकांनी निदर्शनास आणले. अमली पदार्थांच्या जाहिरातींना बंदी असूनही अनेक ठिकाणी या बीभत्स व अश्लील जाहिराती झळकत असल्याने त्यावर नियंत्रण ठेवणारे धोरण असावे, अशी सूचना संदीप लेनकर यांनी केली.
एकापेक्षा अधिक फलक लावणार्‍या दुकानदारांना हे दर भरावे लागून विद्रुपीकरणापासून शहर मुक्त होईल, असे सर्मथन सभागृह नेता शशिकांत जाधव यांनी केले. स्वागत कमानींपोटी ठेकेदाराला दिलेले अडीच कोटी व अनधिकृत होर्डिंग्जमुळे होणार्‍या गैरप्रकारांच्या चौकशीची मागणी राहुल दिवे व नगरसेवकांनी केली. चर्चेत गटनेता अशोक सातभाई, स्थायी सभापती रमेश धोंगडे, अनिल मटाले, अश्विनी बोरस्ते, कुणाल वाघ, यशवंत निकुळे, शाहू खैरे, संजय चव्हाण, गुलजार कोकणी, कल्पना पांडे, सलीम शेख, लक्ष्मण जायभावे, दिनकर पाटील, कन्हैया साळवे, संभाजी मोरुस्कर, दामोदर मानकर, देवयानी फरांदे यांनीही भाग घेतला.
अनधिकृत होर्डिंग्जसह भ्रष्टाचार वाढेल
या अमाप दरवाढीमुळे महापालिकेची परवानगी घेऊन होर्डिंग लावणार्‍यांपैकी अनेकजण विनापरवानगी जाहिरातबाजी करण्याची शक्यता आहे. यामुळे अनधिकृत होर्डिंगमध्ये वाढ होण्याबरोबरच भ्रष्टाचारात भर पडून महसूलही बुडेल. रवी पवार, अध्यक्ष, नाशिक अँडव्हर्टायजिंग वेल्फेअर असोसिएशन
बड्या कंपनीसाठी हा घाट का?
कर चुकवणार्‍यांना अभय देऊन प्रामाणिकपणे कर भरणार्‍या व्यापार्‍यांवर विनाकारण कराचा बोजा लादला जात आहे. एखाद्या बड्या कंपनीला जाहिरातकर वसुलीचे टेंडर देण्याची ही चिन्हे दिसताहेत. - संजय चव्हाण, अध्यक्ष, हॉटेलचालक असोसिएशन