आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • After 67 Years Village People Seen State Transport Bus

67 वर्षांनंतर सहा गावांच्या ग्रामस्थांना एसटीचे दर्शन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इगतपुरी - देशाला स्वातंत्र्य मिळून 67 वर्षे होऊनदेखील तालुक्यातील धार्नोली, शिंदेवाडी, पिंपळगाव भटाटा, गांगडवाडी, वाळविहीर या आदिवासी गावांना एसटी बसचे दर्शन झालेले नव्हते. मात्र, लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नातून अखेर इगतपुरी-वाळविहीर मार्गावर बस धावली आणि ग्रामस्थांना बसचे दर्शन झाले.

इगतपुरी तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात मोठ्या प्रमाणात 100 टक्के आदिवासी वाड्या, गावे आहेत. वाळविहीरसह अन्य पाच गावांची लोकसंख्या सुमारे सात हजार आहे. तरीही या गावांमध्ये बस येत नसल्यामुळे ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांचे हाल होत होते. त्यामुळे ग्रामस्थांना नाईलाजास्तव खासगी वाहतुकीचा आधार घेत जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असे. वाळविहीरचे सरपंच प्रकाश लचके व जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांनी बस सुरू करण्यासाठी आगारप्रमुखांकडे पाठपुरावा केला. त्यामुळे इगतपुरीचे आगारप्रमुख बी. एल. चतुर यांनी वरिष्ठांशी चर्चा करून इगतपुरी-वाळविहीर बस सुरू केली आहे. सध्या ही बस येऊन- जाऊन चार फे-या करणार आहे. इगतपुरी आगारातून ही बस घोटी, धार्नोली, शिंदेवाडी, पिंपळगाव भटाटा, गांगडवाडीमार्गे वाळविहीर येथे पोहोचेल. परतीचा मार्ग हाच असणार आहे. या बसचा सोमवारी दुपारी 1 वाजता शुभारंभ करण्यात आला. या वेळी रायुकॉँचे जिल्हा उपाध्यक्ष वसीम सय्यद, सादिक शेख, सहायक वाहतूक अधीक्षक पी. एच. महाजन आदी उपस्थित होते.

एसटी बसने प्रवास करावा
विद्यार्थी व ग्रामस्थांनी खासगी व जीवघेण्या वाहनाने प्रवास न करता एसटी बसने प्रवास करावा. विद्यार्थ्यांनीही रोजच्या ये-जासाठी पास काढून घ्यावेत, जेणेकरून आगाराच्या उत्पन्नात वाढ होईल. बी. एल. चतुर, आगारप्रमुख

ग्रामस्थांना होणार फायदा
मे महिन्यात एसटी बस सुरू करण्यात येणार होती. मात्र, तांत्रिक अडचणी सांगून बस सुरू होत नव्हती. अखेर सोमवारी बस सुरू झाल्याने ग्रामस्थांना त्याचा फायदा होणार आहे. -प्रकाश लचके, सरपंच, वाळविहीर