आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • After Critics On Modi Raj nitin Gadkari Together At Nashik

राज-गडकरींची एकमेंकांवर स्तुतीसुमने

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- मी नेहमीच चांगल्या कामाच्या पाठिशी उभा राहतो. जेथे जेथे विकासाच्या, इनोव्हेशनच्या 'आयडिया' तेथे तेथे मला जायला आवडते. त्यामुळे माध्यमांनी यातून वेगळे काही काढू नये. मी आणि राज एकत्र आल्याचे वृत्त द्याच पण कशासाठी आलो तेही सांगा, अशा शब्दात नितीन गडकरी यांना पत्रकारांना फटकारले.
नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या तिरात गोदेपार्कच्या भूमिपूजन कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आलेले भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी येथे कोणतेही राजकीय वक्तव्य केले नाही. गडकरी यांनी नेहमीच्या शैलीत विकास, इनोव्हेशन, व्हिजन, पर्यटन, रोजगारनिर्मिती, नाविन्याचा ध्यास याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. राज ठाकरेंनी आपल्या छोट्याखानी प्रास्ताविक भाषणात विकासाची भाषा बोलणारा एकमेव नेता म्हणून गडकरींचे कौतुक केले. नितीन गडकरीसारखा माणूस मंत्री नसता तर मुंबईतील ब्रिज, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आदी उभाच राहू शकले नसते, असे राज यांनी गडकरींच्या कामांचे कौतूक केले. तोच मुद्दा घेऊन गडकरींनी सांगितले की, मी मुंबईतील ब्रिज, वरळी सी लिंक व एक्स्प्रेस वे उभा केला पण त्याचवेळी बाळासाहेबांपाठोपाठ राज यांचेही त्याकडे बारकाईने लक्ष होते. राज यांनी नेहमीच विकासाबाबत बोलत आले आहेत. मी ही त्याचाच विचार करतो. विकास हेच राजकारण असते. विकासात राजकारण आणू नये, त्याकडे उद्ममशिलता म्हणून पाहावे, असे गडकरींनी सांगितले.
गडकरी पुढे म्हणाले, आज आपल्या भारतात सगळे काही आहे. अभाव आहे राजकीय नेतृत्त्वाचा, नाविन्याच्या ध्यासाचा आणि नियोजनाचा. भारतात नद्या आहेत, जंगले आहेत, जमिन आहे, खूप काही करता येईल असा सुजलाम सुफलाम असा भारत देश विविधतेने नटलेला आहे. त्यासाठी राजकारण न आणता चांगले काम करण्याचा सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे, असे सांगत नाशिकमधील गोदेपार्कचा प्रकल्प उत्तम असल्याची पोचपावती त्यांनी दिली. ते म्हणाले, मी राज, नाशिकचे महापौर व हा प्रकल्प साकारण्याचे स्वप्न पाहणा-या लोकांचे अभिनंदन करतो. याचबरोबर या प्रकल्पाला पैसे उपलब्ध करून देत असल्याबद्दल अंबानींचेही अभिनंदन करतो असे गडकरींनी सांगितले.
चांगल्या कामांसाठी कौतुक केलेच पाहिजे यात राजकारण आणू नये, असे सांगत गडकरींनी माध्यमांनाही डोस पाजला. मी राज ठाकरेंच्या व्यासपीठावर आल्याचे जसे वृत्त देता तसेच येथे काय होणार आहे, यातून किती रोजगार निर्मिती होणार आहे, महाराष्ट्रात असे किती ठिकाणी प्रकल्प राबविता येतील याचा विचार व अभ्यास करावा, असे सांगितले. मध्यंतरी मी इथेनॉल मिश्रित प्रकल्पाच्या कार्यक्रमाला शरद पवारांना बोलावले होते. तेव्हा पत्रकारांनी तेथे आमच्या काय चर्चा झाल्या असतील यावर बातम्या रंगवल्या पण तो जगातील एकमेव प्रकल्प आहे व त्यातून काय मिळणार आहे व फायदा होणार आहे याची एकानेही माहिती दिली नाही. तुम्ही जरूर अशा बातम्या द्या पण तेथे ही मंडळी का येतात याचीही माहिती घेत जा असा सल्ला दिला.
पुढे वाचा, सेनेचा तिळपापड तर तावडेंचा माध्यमांना सवाल....