आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • After Result Out Mns Members Celibate Her Victory In Nashik

तणावपूर्ण शांततेनंतर "मनसे' जल्लोष

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापालिकेकडे जाणारे चहूबाजूंचे रस्ते बंद करत पोलिसांनी ठेवलेला कडेकोट बंदोबस्त, कार्यकर्त्यांची गर्दी, राजकीय पक्षांच्या समर्थकांच्या घोषणांनी दुमदुमलेला परिसर.. अशा तणावपूर्ण वातावरणात शुक्रवारी महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक पार पडली अन् ‘रामायण’वर पुन्हा झेंडा रोवल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी.. आणि गुलालाची उधळण करीत जल्लोष साजरा केला.

महापौर िनवडणुकीसाठी कधी नव्हे ती एवढी उत्सुकता या वेळी निर्माण झाली होती. युती व आघाडीचे समीकरण जुळविण्यासाठी अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न सुरू होते. महापौर निवडणूक शांततेत पार पडावी, यासाठी पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सकाळी १० वाजता पोलिसांनी महापालिकेकडे जाणारे दोन्ही बाजूचे रस्ते बंद केले होते. १०.४५ वाजता मनसे व राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक खासगी बसमधून महापालिकेकडे आले. आमदार वसंत गिते यांनी स्वत: लक्ष ठेवत नगरसेवकांना पालिकेत आणले. त्र्यंबकनाका येथील सिग्नलवर बॅरिकेड्स लावून महापालिकेकडे जाणारा रस्ता पाेलिसांनी वाहतुकीसाठी बंद केला होता. तसेच िटळकवाडी सिग्नलवरही पोलिसांनी फौजफाटा तैनात करून रस्ता बंद केला होता. राजकीय पक्षांचे समर्थक कार्यकर्त्यांचा ओढा महापालिकेकडे वळल्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना बाजूला करत महापालिका इमारतीकडे येण्यास मज्जाव केला. दरम्यान, सभागृहात िनवडणूक प्रक्रिया सुरू असताना दुसरीकडे रामायण या महापौर निवासस्थान व पालिकेच्या प्रवेशद्वारालगत कार्यकर्त्यांची गर्दी झाली .

ढोलताशांचा गजर, गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी सुरू करत कार्यकर्त्यांनी विजयोत्सवाचा जल्लोष सुरू केला. महापौरपदी अशोक मुर्तडक यांची निवड झाल्यानंतर ढोलताशांचा एकच गजर करण्यात आला. ‘राज ठाकरे आगे बढो’ अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी महापौरांचे प्रवेशद्वारावर जंगी स्वागत केले. कडक ऊन असतानाही कार्यकर्त्यांमधील उत्साह बघण्यासारखा होता.