आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजपासून पुन्हा धावणार प्रीपेड रिक्षा, दोनशे रिक्षांची नोंदणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- कुंभमेळ्यात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता आणि या प्रवाशंाची लूट थांबावी म्हणून शहरात पुन्हा एकदा प्रीपेड रिक्षा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सोमवारपासून या रिक्षा धावणार आहेत. नाशिकमध्ये येणाऱ्या प्रवाशांना सुरक्षित प्रवास मिळावा आणि आर्थिक लूट थांबावी म्हणून गतवर्षी शहरात प्रीपेड रिक्षा सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र, पुरेसे प्रवासी मिळत नसल्याने आणि रिक्षाचालकांना देण्यात येणारे भाडे परवडत नसल्याने चार महिन्यांपासून ही सेवा खंडित झाली होती.
कुंभमेळ्यासाठी देशभरातून भाविक आणि पर्यटक नाशिकमध्ये दाखल होत असतात. शहराची पुरेशी माहिती नसल्याने आलेल्या भाविकांना आणि पर्यटकांना बहुतांश रिक्षा आणि टॅक्सीचालकांकडून अवास्तव भाडे आकारले जाते. ही आर्थिक लूट थांबावी आणि सुरक्षित प्रवास करता यावा म्हणून पुन्हा एकदा प्रीपेड रिक्षा सुरू करण्याचा निर्णय प्रादेशिक परिवहन कार्यालयानुसार प्रीपेड रिक्षा व्यवस्थापनाने घेतला आहे.
स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर नाशिकरोड रेल्वे स्थानकावर शहरातील पहिले प्रीपेड रिक्षा सेंटर सुरू करण्यात आले होते. मात्र, प्रीपेड रिक्षांना प्रवासी मिळत नसल्याने काही महिने ही सेवा खंडित झाली होती. शहरातल्या रिक्षा व्यवसायाला शिस्त लागावी, प्रवाशांची सुरक्षितता राहावी आणि या व्यवसायाला प्रतिष्ठा लाभावी, या उद्देशाने प्रीपेड रिक्षांचा हा बंगळुरू पॅटर्न नाशिकमध्ये राबविला जात आहे. पहिल्या टप्प्यासाठी यापूर्वी ९.३० रुपये आकारले जात होते. मात्र, पेट्रोलचे दर वाढल्याने पहिल्या टप्प्यासाठी आता १३.७५ पैसे आकारण्यात येणार आहे.
सुरक्षिततेला प्राधान्य
प्रवाशाला मिळणाऱ्या पावतीवर प्रादेशिक परिवहन कार्यालय, ट्रॅफिक पोलिस, रेल्वे सुरक्षा बलाच्या कार्यालयाचा टोल फ्री क्रमांक राहणार आहे. रिक्षाचालकाकडून अथवा प्रवासादरम्यान अनुचित घटना घडल्यास अथवा घडण्याची शक्यता असल्यास प्रवाशांनी टोल फ्री क्रमांकाला कॉल केल्यास तत्काळ मदत मिळणार आहे.
प्रवाशांची गर्दी लक्षात घेता दोनशे प्रीपेड रिक्षा उपलब्ध करून देण्यात आल्या असून, या रिक्षा नाशिकरोड रेल्वे स्थानकाबाहेर उभ्या राहतील. स्थानकाबाहेरील प्रीपेड रिक्षाच्या कार्यालयात प्रवासी गेल्यानंतर प्रवाशाने आपले नाव, मोबाइल नंबर आणि जाण्याचे ठिकाण सांगायचे आहे. त्यानंतर प्रवाशाला दोन पावत्या मिळतील. एक पावती प्रवाशाने त्याच्याकडे ठेवायची असून, इच्छित स्थळी पोहोचल्यानंतर दुसऱ्या पावतीवर सही करून ती पावती रिक्षाचालकाकडे परत करायची आहे. त्यामुळे रिक्षाचालकाने प्रवाशाला सुरक्षितपणे सोडले की नाही, हे कळू शकणार आहे.
चोवीस तास सुविधा उपलब्ध
- बंगळुरूच्या धर्तीवर नाशिक शहरात प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या सहकार्याने प्रीपेड रिक्षा सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, गत चार महिने ही सेवा खंडित झाली होती. रिक्षाचालकांना देण्यात येणारे दर त्यांना परवडत नव्हते म्हणून काही काळ ही सेवा अखंडित झाली होती. मात्र, आता रिक्षाचालकांचे प्रश्न सुटल्याने प्रवाशांना चोवीस तास सुविधा देण्यात येणार आहे. कुंभमेळा लक्षात घेता येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात येणार आहे.
गिरीश मोहिते, व्यवस्थापकीय संचालक, भारतरत्न सहकारी ग्राहक संस्था