आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृषी क्षेत्राला द्या झुकते माप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- शासनाने कृषी क्षेत्राला झुकते माप देण्याची गरज आहे. उत्पादन व गुणवत्ता वाढीविषयक योजनांची शेतकर्‍यांना वेळच्या वेळी माहिती मिळण्यासाठी जिल्हा अथवा तालुका पातळीवर दर तीन महिन्यातून एकदा कृषी प्रदर्शन किंवा मार्गदर्शक उपक्रम राबवावेत, असे आवाहन स्वामी सर्मथ केंद्राचे प्रमुख गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांनी केली.

डोंगरे वसतिगृहाच्या मैदानावर 24 ते 26 जानेवारीदरम्यान दुसरे अखिल भारतीय कृषी साहित्य संमेलन पार पडले. रविवारी संमेलनाच्या समारोपप्रसंगी कृषी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्‍या सात महिला आणि सात पुरुषांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या वेळी अण्णासाहेब बोलत होते. भारतात सुमारे 60 टक्क्यांपेक्षाही अधिक जनता ही कृषीवर उपजीविका करते. मात्र, विभक्तीकरणामुळे या जमिनीचे तुकडे होऊन त्यावर सीमेंटची जंगले उभी राहात आहे. शेती क्षेत्र घटत आहे. तरुण शेतकर्‍यांनी शेतीला अधिकाधिक महत्त्व देऊन उत्पादन क्षमता वाढविण्यावर भर दिल्यास भारत पुन्हा जगात मार्गदर्शक ठरेल, असे मत त्यांनी मांडले.

संमेलनाचे आयोजक अरुण आंधळे-पाटील यांनी प्रास्तविकात घटत्या कृषी क्षेत्रामुळे देशासमोर निर्माण होणार्‍या प्रश्नाकडे लक्ष वेधले. संभावित परिस्थिती टाळण्यासाठी तरुणांनी शेतीकडे वळण्याची गरज आहे. त्यांना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळावे, सकारात्मक विचारमंथन घडविण्यासाठी साहित्य संमेलनाची नीतांत गरज असल्याचे ते म्हणाले. या वेळी आदिवासी आयुक्त संभाजीराव सरकुंडे, माजी मंत्री एम. के.अण्णा पाटील, बारामती विभागीय कृषी केंद्राच्या प्रमुख सुनंदा पवार, माजी विभागीय आयुक्त रवींद्र जाधव, चंद्रकांत मोरे, कृषी अधीक्षक मधुकर पन्हाळे, प्रकल्प संचालक सुभाष नागरे, उपसंचालक बाळासाहेब मुसमाडे, विभागीय कृषी अधिकारी हेमंत काळे, बाजीराव सोनवणे आदी उपस्थित होते.

संमेलनात मांडलेले ठराव

  • मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून कृषी संमेलनासाठी दरवर्षी 50 लाख तर कृषी विभागाच्या अर्थसंकल्पातून 35 लाखांची तरतूद करावी.
  • कृषी साहित्य संमेलनाच्या कार्याध्यक्षांची राज्य कृषी विभागाच्या नियोजन समितीवर नियुक्ती करावी.
  • कृषी संमेलनांतर्गत वर्षभर विभागीय स्तरावर कृषी साहित्य संस्कृती मेळावे घ्यावेत. त्यासाठी ‘आत्मा’ योजनेतून नियोजन आणि अर्थ साहाय्य द्यावे.
  • कृषी साहित्यनिर्मिती वाढविण्यासाठी या क्षेत्राशी निगडित संस्थांना प्रती पुस्तक 50 टक्के अनुदान मिळावे.


यांना मिळाला पुरस्कार
पुरुष पुरस्कारार्थी : सदाशिव शेळके (सेंद्रिय शेती), सचिन प्रभाकर वाघ (कृषी पत्रकारिता),भाऊसाहेब जाधव (रोपवाटिका व्यवस्थापन), डॉ.मंगेश देशमुख (आत्मा), दौलतराव कडलग (आदर्श शेतकरी), ज्ञानेश बेलेकर (कृषी व्यंगचित्रकार), डॉ. प्रमोद रसाळ (गहू संशोधन)


महिला पुरस्कारार्थी : शारदा महाडुळे (कृषीप्रक्रिया उद्योग), यामिनी भाकरे (कृषी पत्रकारिता), अर्चना देशमुख (कृषी विस्तार कार्य), सुनंदा पाटील(आदर्श महिला शेतकरी), हेमलता खडके (उद्यान पंडित), आशा नाईक (रेशीम किडा संशोधन), अश्विनी बोरस्ते (उत्कृष्ट बचतगट)