आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी नाही, व्यापारीच देणार आडत; संप मागे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशिकमधील व्यापारी आणि आडतदारांत गुरुवारी आडतीच्या टक्केवारीवर बैठक होऊन शेतकऱ्यांकडून कोणतीही आडत घेण्यात येणार नसून, व्यापाऱ्यांकडून पावणेतीन टक्के आडत तसेच बाजार समितीला एक टक्का शुल्क देण्याचे निश्चित झाले. व्यापाऱ्यांनी या निर्णयाला मान्यता दिल्याने नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील भाजीपाल्याचे लिलाव गुरुवारी दुपारनंतर अखेर पाच दिवसांनी पूर्ववत झाले. मात्र, नाशिक बाजार समिती वगळता जिल्ह्यात इतरत्र कांद्याचे लिलाव बंद राहतील. नाशिक बाजार समितीत कांद्यावर तसेच बटाटा आणि डाळिंबाच्या लिलावात व्यापारी टक्के आडत देणार असून, त्याचे लिलाव आज (दि. १५)पासून सुरू होतील.
आडत आणि बाजार समिती नियमनमुक्तीविरोधात आडतदार आणि व्यापाऱ्यांनी बाजार समित्यांतील लिलाव बंद ठेवले होते. त्यामुळे किरकोळ बाजारातील भाजीपाल्याचे दर कडाडले होते. सहकार आणि पणनमंत्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या बैठकीत नाशिक वगळता राज्यातील व्यापाऱ्यांनी माघार घेतली होती. त्यानंतर गुरुवारी नाशिकमध्येही व्यापारी आडतदारांत बैठक होऊन वादावर तोडगा काढत संप मागे घेण्यात आला. बैठकीस बाळासाहेब कर्डक, चंद्रकांत निकम, ईश्वर गुप्ता, जगदीश अपसुंदे, श्याम बोडके, आनंद पिंगळे आदी उपस्थित होते.

^आडतदार आणिव्यापाऱ्यांच्या बैठकीत पावणेतीन टक्के आडतदारांना आडत देण्याचे निश्चित झाले. लिलाव पूर्ववत होणार असल्याने शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा. -संदीप पाटील, व्यापारी संचालक

डाळिंबलिलाव आजपासून
^डाळिंब मार्केट शुक्रवारपासून सुरू होईल. व्यापारी आणि आडतदारांत बोलणी झाली असून, व्यापाऱ्यांनी टक्के आडत देण्याचे निश्चित केले आहे. डाळिंब लिलावात शेतकऱ्यांकडून कोणतीही आडत घेतली जाणार नाही. -ईश्वर गुप्ता, आडतदार, जय महाराष्ट्र कंपनी

शेतकऱ्यांनी सहकार्य करावे
^व्यापाऱ्यांकडून आडतदारांना पावणेतीन टक्के आडत आणि बाजार समितीला टक्का बाजार समिती शुल्क देण्याचे निश्चित झाले आहे. लिलाव सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी आता सहकार्य करावे. - बाळासाहेबकर्डक, आडतदार

शेतकऱ्यांसाठी बाजार समिती सुरक्षित
^दोन्हीघटकांनी योग्य निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांची आता गैरसोय होणार नाही. शेतकऱ्यांना कोणतीही आडत लागणार नसल्याने शेतकऱ्यांनी सुरक्षिततेसाठी भाजीपाला विक्रीसाठी बाजार समितीत आणावा. -अरुणकाळे, सचिव, नाशिक बाजार समिती

बहुतांश नाशिकवर अवलंबून
नाशिक जिल्ह्यातील हवामान सर्वच भाजीपाला, फळपिकांसाठी अनुकूल अाहे. जिल्ह्यात डाळिंब, द्राक्ष, टरबूज, खरबूज, पेरू, सीताफळ, स्ट्रॉबेरी, कांदा, टोमॅटो यांच्यासह काकडी, मेथी, कोथिंबीर, गवार, शेवगा, शेपू, सिमला मिरची, हिरवी मिरची आदी भाजीपाला उत्पादित होतो. एकट्या नाशिकमधून प्रतिदिन सुमारे अडीचशे ते तीनशे क्विंटल भाजीपाला मुंबई, कल्याण, ठाणे, सुरत, बडोदा, अहमदाबाद, इंदूर, पुणे आदी शहरांत पाठविला जातो. संपकाळात या ठिकाणचा भाजीपाला पुरवठा ठप्प झाल्याने दर कडाडले होते. आता लिलाव पूर्ववत झाल्याने भाजीपाल्याची आवक वाढून दरात घसरण होईल.

बातम्या आणखी आहेत...