आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘उडाण’च्या दुसऱ्या टप्प्यात नाशिकमधून सहा शहरांकरिता विमानसेवा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- राज्यातील महत्त्वाच्या शहरांना हवाई मार्गाने जोडण्याचा पहिला टप्पा मार्गी लागल्यानंतर आता नाशिक शहर दुसऱ्या टप्प्याच्या स्पर्धेत आले आहे. केंद्र शासनाच्या ‘उडाण’ योजनेंतर्गत दुसऱ्या टप्प्यांत नाशिक देशभरातील सहा प्रमुख शहरांना जोडले जाणार आहे. यात हैदराबाद, बंगळुरू, दिल्ली, गोवा, भोपाळ, अहमदाबाद या शहरांचा समावेश असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. देशभरातील प्रमुख शहरांसाठी नाशिक विमानतळावरून ही सेवा सुरू होणार असल्याने शहरवासीयांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. 


लहान शहरांमधील विमानतळे मोठ्या शहरांमधील विमानतळांना जोडले जावे, यासाठी केंद्र शासनाने दोन वर्षांपूर्वी उडाण योजना जाहीर केली होती. या योजनेंतर्गत नाशिक राज्यातील प्रमुख शहरांना जोडण्यासाठी खासदार हेमंत गोडसे यांनी प्रयत्न केले होते. पहिल्या टप्प्यात पुणे अाणि मुंबई या दाेन मार्गांवर एअर डेक्कनकडून विमानसेवा सुरू होणार असल्याने शासनाने नाशिक रिजनल कनेक्टिव्हिटी स्किम (उडाण) च्या दुसऱ्या टप्प्यातून वगळले हाेते. त्यामुळे पुढील काळातील परिणाम ओळखून प्रसंगवधान राखत खासदार गोडसे यांनी पुन्हा नागरी हवाई मंत्रालयाशी संपर्क साधला. 


नाशिक येथून राज्यातच नव्हे तर देशभरातील प्रमुख शहरांसाठी प्रत्यक्ष विमानसेवा सुरू झाल्याशिवाय नाशिकला याेजनेमधून वगळू नये, अशी मागणी लावून धरली. त्यासाठी त्यांनी कायम नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाशी संपर्क ठेवला. यामुळे नाशिक शहर आता हवाई मार्गाच्या दुसऱ्या टप्प्याच्या स्पर्धेत आले आहे. येत्या काळात नाशिक येथून हैदराबाद, बंगळुरू, दिल्ली, गोवा, भोपाळ, अहमदाबाद या प्रमुख शहरात विमानसेवा सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 


एअर डेक्कनचे उडाण लांबणार 
मुंबईविमानतळावर टाइम स्लॉट उपलब्ध नसल्याचे कारण देत विमानसेवा कंपनी हवाई सेवा सुरू करत नसल्याने संतप्त झालेल्या खासदार गोडसे यांनी दिल्लीतील नागरी उडाण मंत्रालयाच्या समोर जोरदार आंदोलन केले होते. त्याची दखल शासनाने मुंबई विमानतळावर टाइम स्लॉट उपलब्ध करून दिला. यामुळे १५ डिसेंबरपासून विमानसेवा सुरू करण्याचे अाश्वासन गाेडसे यांना दिले गेले हाेते. मात्र, एअर डेक्कनकडून अाफ्रिकेतून विमान मागविण्यात अाले असून ते अाल्यानंतर पुढील प्रक्रिया पार पडल्यानंतरच ही सेवा सुरू हाेईल. 

बातम्या आणखी आहेत...