आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यवसायाचा ध्यास घेतल्यास उत्तुंग यश शक्य : डॉ. मराठे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- प्रत्येक मराठी माणसाने उद्यमशील बनावे. तसेच उठता, बसता केवळ व्यवसाय व व्यवसायवृद्धीचा विचार केल्यास प्रत्येकाला उत्तुंग यश मिळवणे शक्य असल्याचे प्रतिपादन प्रख्यात उद्योजक व सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे विश्वस्त अजित मराठे यांनी केले. शहरातील सॅटर्डे क्लबच्या वतीने ‘व्यवसाय वृध्दीच्या संधी’ या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर सॅटर्डे क्लबचे संस्थापक अध्यक्ष माधवराव भिडे, प्रमुख पाहुणे विराज लोमटे, नितीन दाते, संदीप सोमवंशी, छबीराज राणे आदी मान्यवर उपस्थित होते. मराठे पुढे म्हणाले की, सद्यस्थिती ही उद्योजकांसाठी अत्यंत अनुकूल असून, प्रत्येकाने या संधींचा लाभ घेण्याची गरज आहे. व्यवसाय वृद्धीचा जितक्या वेगळ्या दृष्टीने विचार कराल, तेवढय़ा मोठय़ा आणि अधिक प्रमाणात या संधी असल्याचे तुम्हाला लक्षात येईल. त्यामुळे विस्तारासाठीचा विचार करताना प्रत्येक बाब आंतरराष्ट्रीय पातळीवर कशी करता येईल, असा विचार करण्याचे आवाहनदेखील त्यांनी केले.
माधवराव भिडे यांनी तर घरातला मराठी माणूस नोकरी करत असल्यास प्रत्येक गृहिणीने त्याला उद्योगव्यवसायात येण्यासाठी उद्युक्त करण्याचे आणि त्या व्यवसायात स्वत:देखील योगदान देण्याचे आवाहन केले. मराठी माणूस उद्यमशील नाही ही प्रतिमा हळूहळू पुसण्यात आपण नक्कीच यशस्वी होऊ, असा विश्वासदेखील त्यांनी व्यक्त केला. विराज लोमटे यांनीदेखील प्रत्येक मराठी माणसाने व्यवसायात उतरण्याचे धाडस करण्याची आवश्यकता असल्याचे नमूद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत जोशी यांनी स्वागत नितीन दाते यांनी तर सूत्रसंचालन संदीप सोमवंशी यांनी केले.