आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेतकर्‍यांना माफकदरात वीज देण्यास कटिबद्ध- अजित पवार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- राज्यात शेतकर्‍यांना आणि यंत्रमागधारकांना सवलतीच्या दरात वीज देण्यात येणार असून राज्य भारनियमन मुक्त करण्यास शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री व उर्जामंत्री अजित पवार यांनी केले. म्हसरुळ येथे उपकेंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मुख्य अभियंता के.व्ही.अजनाळकर होते.

कार्यक्रमास वैद्यकीय तंत्र शिक्षणमंत्री विजयकुमार गावित, खासदार समीर भुजबळ, आमदार उत्तमराव ढिकले, जयवंत जाधव, विभागीय आयुक्त रवींद्र जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

पवार पुढे म्हणाले की, राज्यात शेती, उद्योग पाण्यावर चालतात. येथे विजेचा वापर होतो. त्या उद्देशाने सबस्टेशन उभारण्यात येत आहेत. भारनियमन मुक्तीच्या अनुषंगाने इंप्रा 1 आणि 2 असे कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. 2.50 युनिट दराने उद्योगांना वीज देण्यात येणार आहे. एकलहरा येथील प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडणार नाही त्यांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे.

सिंहस्थाकरता डीपीसीचा भरघोस निधी वापरण्यात येणार असून, बांधकाम विभाग, जलसंपदा, आणि महापालिका यांच्या माध्यमातून नियोजन करण्यात येणार आहे. वीज चोरी करण्याचे प्रमाण वाढले आहे. हे प्रमाण रोखण्याकरिता मागेल त्याला वीज देण्याची योजना आहे. प्रास्ताविक के. व्ही. अजनाळकर, आर. डी. चव्हाण यांनी केले, तर आभार आणि सूत्रसंचालन सहायक अभियंता जयंत पाटील यांनी केले

दादागिरी कायम
नेहमीप्रमाणेच उशीर झाल्याने पवार यांनी व्यासपीठाचा ताबा घेत भाषणास सुरुवात केली. मानपान राहून गेल्याने वाईट वाटून घेऊन नका असे ते म्हणताच आमदार ढिकले यांनी आम्हाला वाईट वाटले, तरी चालेल जनतेला वाईट वाटू देऊ नका. असे म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.