आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकसाठी अर्थसंकल्पात सर्वाधिक निधी देणार - अजित पवार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिन्नर - पश्चिम महाराष्ट्रापुरता तसेच ग्रामीण लोकांचा पक्ष असे हिणवले जाणा-या राष्ट्रवादी कॉँग्रेसने नगरपरिषद निवडणुकीत राज्यभरात ताकद दाखवत अग्रस्थान पटकावले. जिल्हा परिषद निवडणुकीत विजयाची ही मालिका चालू ठेवण्यासाठी जनतेने शरद पवार यांच्या विचारांची पाठराखण करावी. येत्या अर्थसंकल्पात नाशिक जिल्ह्याच्या विकासासाठी आजवर कधीही मिळाला नाही एवढा निधी देण्याची तरतूद करणार असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी येथे दिले. माजी मंत्री तुकाराम दिघोळे, प्रकाश वाजे, राजाभाऊ वाजे, उदय सांगळे, सागर जाधव, चंद्रकांत वरंदळ आदींच्या पक्ष प्रवेशाच्या निमित्ताने झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.
पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत पवार व पिचड यांच्यासह पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आमदार माणिकराव कोकाटे यांचे नाव न घेता टीकास्र सोडताना सिन्नर तालुक्यात राष्ट्रवादी कॉँग्रेस मजबूत करण्यासाठी दिघोळे, वाजे, सांगळे यांना सर्वतोपरी ताकद देण्याची ग्वाही दिली.
कोकाटेंवर बोचरी टीका - आपणास दिलेला शब्द पाळला, आपल्या पक्षाचा लोकसभेचा उमेदवार सिन्नरकरांनीच निवडून दिला ‘फक्त एक आठवण’ अशा प्रकारच्या मजकुराचे शरद पवार आणि अजित पवारांच्या स्वागताचे फलक कोकाटे यांनी त्यांच्या छबीसह गावात लावले होते. त्याची दखल घेत भुजबळ यांनी त्याची आपल्या उपहासगर्भ शैलीत खिल्ली उडवली. समीरने मत तर आपल्या पक्षाच्या पंतप्रधानांना दिले ना असा उलटा सवालही केला. शरद पवार यांच्या उपस्थितीत लोकसभा निवडणूक सभेत कोकाटे यांनी तुकाराम दिघोळे यांचा खेचर म्हणून उल्लेख केला होता याचे पवार यांना वाईट वाटले होते ही बाब आम्ही कोणीच विसरलो नाही, याची आठवण करून देतो. लोकसभा निवडणुकीत सिन्नरमधून समीरला 49 हजार मते मिळाली, तर विधानसभेत कोकाटे यांना 75 हजार. मग कोकाटे यांनी वरची 25 हजार मते कुठे लपवून ठेवली अशी विचारणा करताना लपवून ठेवलेली मते मिळावीत यासाठीच दिघोळे, वाजे, सांगळे यांची पक्षात बेरीज केल्याचे भुजबळ म्हणताच हशा पिकला. सिन्नर तालुक्यातील मतदारांनी कोकाटे यांची केव्हाच वाट लावली.
मतदारसंघाची फेररचना झाली नसती आणि इगतपुरीतील टाकेद, सिन्नरला जोडले नसते तर ते आमदार झाले असते का? याची आठवण ठेवा असे सांगत काचेच्या घरात राहणा-यांनी दुस-यावर दगड फेकू नयेत, या शब्दांत अजित पवार यांनी कोकाटे यांचा समाचार घेतला. ते पुढे म्हणाले की, डिसेंबर 2012 अखेर राज्य भारनियमन मुक्त होईल. सिन्नरमध्ये विकासाला वाव आहे. त्यासाठी जमीन द्यावी लागल्यास त्याचा योग्य मोबदला शेतक-यांना दिला जाईल. पंडित अण्णा मुंडे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाबद्दल ते म्हणाले की, आम्ही कोणाच्या घरावर दरोडा घालत नाही तसेच पक्षात येणा-यांना अडवतही नाही.
दिघोळे, वाजे, सांगळे यांचा पक्ष प्रवेश - माजी राज्यमंत्री तुकाराम दिघोळे, प्रकाश वाजे, जनसेवा मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ वाजे, जिल्हा युवक कॉँग्रेसचे माजी अध्यक्ष उदय सांगळे, सगर विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष आणि माणिकराव कोकाटे यांचे निकटवर्तीय चंद्रकांत वरंदळ, शिवसेनेचे गोविंद लोखंडे, किरण कोथमिरे, सागर जाधव, तालुका कॉँग्रेसच्या माजी महिला अध्यक्षा भामाताई लोंढे, जि. प. सदस्या नंदाताई भाबड, मनसेचे माजी पदाधिकारी संजय सानप, शेखर चोथवे आदींसह दिघोळे, वाजे, सांगळे यांच्या शेकडो समर्थकांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
तीन तासांचा सोहळा - सुमारे तीन तासांहून अधिक वेळ चाललेल्या या सभेस तालुक्यातून मोठा जनसमुदाय उपस्थित होता. यावेळी बंडूनाना भाबड, गोविंद लोखंडे, चंद्रकांत वरंदळ, सागर जाधव, उदय सांगळे, राजाभाऊ वाजे, प्रकाश वाजे, तुकाराम दिघोळे, आमदार जयंत जाधव, भगीरथ शिंदे, आमदार जितेंद्र आव्हाड, खासदार समीर भुजबळ, प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांची भाषणे झाली. पत्रकार विलास पाटील, नामदेव कोतवाल यांनी सूत्रसंचालन, तर कृष्णाजी भगत यांनी आभार मानले.
पवार - भुजबळ यांची केमिस्ट्री जुळली - अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यापासून त्यांच्यात व छगन भुजबळ यांच्यात दुरावा असल्याच्या पार्श्वभूमीवर एका व्यासपीठावर आलेल्या उभयतांच्या बोलण्याकडे सगळ्यांचे लक्ष होते. भुजबळांनी आपल्या भाषणात पवार-भुजबळ वेगळे नाहीत, जिकडे पवार तिकडे भुजबळ आणि जिकडे भुजबळ तिकडे पवार अशी फटकेबाजी केली. पवारांच्या पक्षाचा पहिला अध्यक्ष छगन भुजबळ होता हे विसरू नका. राष्ट्रवादीत मतभेदांना वाव नाही अशी ग्वाही त्यांनी दिली. भाषणात अजितदादांचा उल्लेख करत आपल्यात कटुता नसल्याचे त्यांनी दाखवून दिले, तर अजितदादांनीही भुजबळांविषयी सन्मानजनक संदर्भ देत उभयतांमध्ये सौहार्द पर्व सुरू असल्याचे दर्शविण्यात कमतरता ठेवली नाही.