आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ajit Pawar Speaking In Press Conformance At Nashik

युतीच्या काळात टोल संस्कृतीचा जन्म- अजित पवार यांची टीका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड- राज्यात युतीच्या कार्यकाळातच टोल संस्कृतीचा जन्म झाला असून, टोल लागू करणारेच टोलमाफीची मागणी करत असल्याची टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. सत्तेबाहेर घोषणा करणे सोपे असते, असा टोलादेखील त्यांनी लगावला. जिल्हा नियोजन आराखडा बैठकीसाठी आलेले उपमुख्यमंत्री बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते.

युती काळात मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे, मुंबईत 55 उड्डाणपूल बांधण्यात आल्यानंतर टोल तसेच डिझेल-पेट्रोलवर अतिरिक्त कर युतीने लावला. वीज फुकट देऊ सांगणारे पैसे कोठून आणणार, असा सवाल त्यांनी केला. टोल धोरणाला सर्मथन अथवा विरोध नाही; टोलशिवाय रस्ते विकास शक्य नाही. सध्या टोल बंद करायचा ठरल्यास ठेकेदाराला कर्ज, व्याज परत करावे लागेल. त्याचा तिजोरीवर बोजा पडेल, असे ते म्हणाले. येत्या अर्थसंकल्पात जुन्या योजना बंद करून नवीन योजना राबवणार असून टोलबाबत येत्या काळात नवीन धोरण तयार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शिवसेनेने आत्मपरीक्षण करावे : उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीवर केलेल्या टीकेचाही त्यांनी समाचार घेतला. गेल्या 15 वर्षांपासून शिवसेनेचे नेते ‘भगवा फडकणार’ म्हणून सांगत आहे. असे सांगितले नाही तर कार्यकर्ते त्यांच्याजवळ कसे राहतील, असे ते म्हणाले. शिवसेनाप्रमुखांनी शपथ दिल्यानंतरदेखील शिवसेनेचे खासदार, आमदार सोडून गेल्याची आठवण त्यांनी करून दिली.

कुंभमेळ्यासाठी विशेष अधिकारी : कुंभमेळ्यासाठी विशेष अधिकारी नेमण्याबद्दल विचार केला जात आहे. या अधिकार्‍याला गोपनीय अहवाल लिहिण्याचे तसेच अन्य अधिकार देण्याबाबतचा विचार सुरू आहे.

उमेदवार ‘भुजबळ’च!
नाशिक लोकसभेच्या उमेदवाराबद्दल विचारले असता त्याचा निर्णय संसदीय मंडळ घेईल, असे त्यांनी सांगितले. मात्र, जो उमेदवार असेल तो भुजबळच असेल हे नक्की, असे उत्तर अजित पवार यांनी दिले.