आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप आमदारांच्या घरावर आज सर्वपक्षीय घंटानाद, उद्या मोर्चा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सर्वोच्च न्यायालयाचा दोन दिवसांत काय तो निवाडा येऊ द्या, न्यायालयाने म्हटले पाणी सोडा तर हरकत नाही, मात्र न्यायालयाचे ऐकता सत्तेचा वापर करून नाशिककरांच्या तोंडचे पाणी पळवू नका, अशी विनवणी करीत तब्बल तीन तास जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांना गंगापूर धरणातील पाणी थांबवण्याच्या मागणीसाठी सोमवारी घेराव घालण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्याकडे आदेश नसल्याचे सांगत पालकमंत्र्यांच्या सूचनेप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधण्याचा आटाेकाट प्रयत्नही केला.
प्रत्यक्षात स्वीय सहाय्यकांकडून साधा निरोपही पाठवला जात नसल्यामुळे संतप्त आंदोलकांनी मुख्यमंत्री पालकमंत्र्यांच्या नावाने जोरदार घोषणाबाजी करून शिमगा केला. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनाप्रमाणे पाणी थांबण्याबाबत निर्णय झाल्यास आधी मंगळवारी नाशिक जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती. परंतु, रात्री महापौरांच्या ‘रामायण’ या निवासस्थानी झालेल्या बैठकीत परीक्षा तसेच सणासुदीच्या दिवसांचे भान ठेवून हा बंद रद्द करण्यात आल्याचा निर्णय घेऊन त्याऐवजी मंगळवारी (दि. ३) भाजप आमदारांच्या घरावर घंटानाद आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली, तसेच बुधवारी (दि. ४) शहरातून सर्वपक्षीय विराट मोर्चा काढण्यात येणार असून, त्यात नाशिककरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ही करण्यात आले आहे. एवढेच नव्हे, तर पालकमंत्री गिरीश महाजन यांना पालकत्वाची भूमिका बजावता येत नसल्याचा आराेप करून त्यांना वेगळ्या पध्दतीने जिल्हा बंदी करण्याची घोषणाही करण्यात आली.

गंगापूर धरणातून रविवारी मध्यरात्री थांबवलेले पाणी सोमवारी दुपारी सोडण्यास सुरुवात झाल्यानंतर नाशिकमध्ये राजकीय हालचालींना वेग आला. पुन्हा महापौरांचे ‘रामायण’ हे निवासस्थान आंदोलनाचे केंद्र बनले. त्यानंतर आमदार अनिल कदम, जयवंत जाधव, महापौर अशोक मुर्तडक, जिल्हा परिषद अध्यक्षा विजयश्री चुंभळे, अजय बोरस्ते, शरद आहेर, राहुल ढिकले, अनिल मटाले, कविता कर्डक, शिवाजी चुंभळे, छबू नागरे, अंबादास खैरे, सुरेश मारू, रवींद्र पगार यांच्यासह नेत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर पायी मोर्चा काढला. त्यानंतर जिल्हाधिकारी कुशवाह यांच्या दालनात ठिय्या मांडत तब्बल साडेतीन तास पाणी थांबवण्यासाठी युक्तिवाद करण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या अखत्यारीत निर्णय नसल्याचे सांगितल्यावर आमदार कदम जाधव यांनी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असल्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांना सर्व निर्णय घेण्याचे अधिकार असल्याचे परिपत्रकही वाचून दाखवले. मात्र, या परिस्थितीत उच्च न्यायालयाचे निर्देश असल्यामुळे निर्णय घेता येणार नाही, असे सांगत शासनाशी चर्चा करावी लागेल, असे स्पष्ट केले.
न्यायालयाने स्थगिती दिली तर पाणी परत कसे आणणार
सर्वोच्च न्यायालयात अपिलासाठी खासदार हेमंत गाेडसे हे गेले आहेत. अजून उच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे अपिलासाठी एक दिवसाचा अवधी बाकी आहे. अशा परिस्थितीत सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली तर सोडलेले पाणी पुन्हा कसे गंगापूर धरणात आणणार, असा सवाल आंदोलकांनी केला. सर्वोच्च न्यायालयात जाण्यापूर्वीच त्यांचे दरवाजे एकप्रकारे बंद करणे हाही एक अवमान ठरेल, असे सांगत जिल्हाधिकाऱ्यांना पाणी सोडण्याचा निर्णय थांबवण्याकरिता वेगवेगळे युक्तिवाद करून वळवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

तणाव, हशा आणि घोषणाबाजीचे हाय डेसिबल
‘पळून गेले रे, पळून गेले, पालकमंत्री पळून गेले,’ ‘भाजप सरकारचा निषेध असो’ अशा नानाविध अभिनव घोषणा देण्यासाठी धडपड सुरू होती. जिल्हाधिकारी दालनात तणाव वाढत असल्याचे बघून एकापाठोपाठ एक पोलिस अधिकारी आवश्यक कुमक घेऊन जमा झाले. त्यात पोलिसांकडून आंदोलकांना बाहेर पिटाळण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. ते बघून कदम यांनी जमाव मोठ्या आवाजात घोषणा देण्यापलीकडे काहीही करत नसून, कोणत्याही कायद्याचे उल्लंघन होणार नाही तसे झाले तर मी जबाबदार, अशी ग्वाही देऊन पोलिसांना अकारण त्रास देऊ नका, अशी विनंती केली. त्यानंतर मात्र कर्णकर्कश आवाजात घोषणाबाजी सुरू झाली. अशातच सरकारचा निषेध करीत असताना त्यात ‘अरे बाबांनो, शिवसेना नाही फक्त भाजप सरकार’ अशी दुरुस्ती करा, असे कदम यांनी सांगताच हशा पिकला.
विलासराव घ्यायचे
रिक्षावाल्याचा फोन

मुख्यमंत्र्यांना वारंवार फोन करून संपर्क होत नसल्यामुळे आंदोलक संतप्त झाले होते. जयवंत जाधव यांना मुख्यमंत्र्यांच्या पीएकडून उडवाउडवीचे उत्तर मिळाल्यानंतर जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. त्यानंतर जाधव यांनी पीएला फैलावर घेत विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री असताना साध्या रिक्षाचालकाचा फोन घ्यायचे, परिस्थिती बघून किमान लोकप्रतिनिधींचा फोन तरी घेण्याविषयी मुख्यमंत्र्यांना कळवा, असे सुनावले.
पाणीविसर्गाबाबत शंका
जिल्हाधिकारी कार्यालयात जेंव्हा नेत्यांनी ठिय्या मांडला होता. त्यावेळी मराठवाड्यासाठी सोडलेला पाण्याचा विसर्ग थांबविण्यात आल्याचे सांगण्यात आले. परंतु, हा विसर्ग सुरुच होता. त्यामुळे पाण्याच्या विसर्गाबाबत शंका व्यक्त करण्यात आली.
सर्वपक्षीयांनी एकत्र यावे
आमदार अनिल कदम, महापौर अशोक मुर्तडक यांनी मंगळावारच्या घंटानाद आंदोलनात सर्वपक्षीय नगरसेवकांनी एकत्र यावे असे सांगून नाशिककरांनाही यात मोठ्या संख्येने यात सामिल व्हावे असे आवाहन केले.
म्हणून घंटानाद
सणासुदीच्यादिवसांमुळे जिल्हा बंद आंदोलन करुन नागरिकांना वेठीस धरण्यापेक्षा भाजप आमदारांच्या घरावर घंटानाद आंदोलन करण्यात येईल. आंदोलन लोकशाही पद्धतीने होईल, मात्र काही समाजकंटकांनी त्याचा फायदा घेऊन धुडगूस घातला तर त्यास जिल्हाधिकारी वा जिल्हा प्रशासनच जबाबदार असेल. अनिल कदम, आमदार, शिवसेना

पालकमंत्र्यांकडून भूमिका नाही
नाशिकचे पालकमंत्री असून, नाशिककरांच्या तोंडचे पाणी पळवले जात असतानाही कोणतीही भूमिका घेतली जात नाही. साधा मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधण्यासाठी ते प्रयत्न करीत नाहीत. ज्यांना पालकत्वाची जबाबदारी निभवायची नसेल त्यांना जिल्ह्यात पाऊल ठेवण्याचा अधिकार नाही. जयवंत जाधव, आमदार, राष्ट्रवादी

>जायकवाडीत पाणी ४८ तासांत पोहोचण्याचा अंदाज पान
>बंदोबस्तात गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग पान
>तर शहरात दिवसाआड पाणीपुरवठा दिव्य सिटी
>एमआयडीसीवर चिंतेचे ढग दिव्य सिटी

पाठपुरावा सुरू
नाशिकमधील परिस्थितीबाबत विस्तृत अहवाल जलसंपदामंत्री, मुख्यमंत्र्यांकडे पाठवला जाईल. त्यांच्याकडून सकारात्मक निर्णय होईल. थोडा अवधी द्या. कायदा सुव्यवस्था हातात घेऊन काही उपयोग होणार नाही. दीपेंद्रसिंह कुशवाह, जिल्हाधिकारी