आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • All The Charges Remove From Shivsainik, Lawyers Cell At Central Office

शिवसैनिकांवरील राडा केसेस निघणार निकाली, मध्‍यवर्ती कार्यालयात वक‍िलांचा सेल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - जनसामान्यांच्या प्रश्नावर प्रसंगी कायदा हाती घेण्याचे धाडस दाखवून राडा करणार्‍या शिवसैनिकांवरील केसेस निकाली काढण्यासाठी आता मध्यवर्ती कार्यालयातच वकिलांचा सेल सुरू होणार आहे. येथे केवळ शिवसैनिकच नाही तर सर्वसामान्यांनाही कायदेविषयक सल्ले तसेच पोलिसांच्या खोट्या केसेससंदर्भातील तक्रारीचे कसे निराकरण करायचे याचे मार्गदर्शन मिळेल.


कडवट शिवसैनिक आणि शिवसेना हे चित्र व्यापक करण्यासाठी आता संघटनात्मक पातळीवर प्रयत्न सुरू झाले आहे. शिवसेनेसोबत समाजातील विविध घटकांना जोडणे व त्यांच्या ज्ञानाचा तसेच कामकाजाचा फायदा लोकांबरोबरच पक्षाला करून देण्याचा त्यामागचा उद्देश आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेनेत कायदेशीर सल्लागारांचा सेल कार्यान्वित केला जाणार आहे. त्यात जवळपास 125 वकिलांची नेमणूक केली जाणार असून, नुकताच त्यांचा पक्षप्रवेशही मातोश्री येथे झाला. या वकिलांमधील काहींना शालिमार येथे स्वतंत्र कक्ष दिला जाणार आहे. शिवसेनेसोबत काम करताना आंदोलने, मोर्चे तसेच राजकीय वैमनस्यातून अनेकांवर केसेस आहेत. काहींवर खटले सुरू झाले असून, अर्थिक परिस्थितीमुळे त्यांना खटले लढवणे अशक्य झाले आहे. मुख्यत्वे केसेस निकाली काढण्याचेही अनेकांना योग्य पद्धतीने मार्गदर्शनच मिळालेले नाही. या पार्श्वभूमीवर कायदेशीर सेलमधील वकील शिवसैनिकांच्या केसेसचा अभ्यास करून त्या निकाली काढण्यासाठी कृती आराखडाच तयार करणार आहेत.


विकासकामांवर अभियंत्यांचे लक्ष
महापालिकेमार्फत शहरात मोठय़ा प्रमाणात विविध स्वरूपाची कामे सुरू आहेत. या कामांमध्ये विविध रस्त्यांपासून तर अन्य विकासकामांचा समावेश आहे. या सर्व कामांचा गुणवत्तेचा दर्जा तसेच कामादरम्यान वापरले जाणारे साहित्य यावर शिवसेनेच्या अभियंता सेलचे लक्ष राहाणार आहे. या सेलच्या अभियंत्यांकडून तक्रार आल्यास शिवसेनेमार्फत संबंधित काम करणारा कंत्राटदार व पालिकेच्या अधिकार्‍यांना जाब विचारून कामात सुधारणा करण्यासाठी दबाव निर्माण केला जाणार आहे.


केसेसची संख्या घटेल
अत्यंत आक्रमक असलेल्या शिवसैनिकांवर कामकाज करताना प्रचंड केसेस दाखल झाल्या आहेत. त्या केसेस निकाली काढण्यासाठी शिवसेनेचा लिगल सेल कार्यरत असेल. जुन्या केसेस कोणत्या, त्यांची स्थिती काय याचा अभ्यास करून ते शिवसैनिकांना पाठबळ देतील. अजय बोरस्ते, महानगरप्रमुख, शिवसेना