आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंबडच्या अग्निशमन केंद्रासाठी अजूनही प्रतीक्षाच!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- अंबड औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांची अने वर्षांपासूनची मागणी असलेले अग्निशमन केंद्र कार्यान्वित होण्यास अजून दीड वर्षाचा कालावधी लागणार आहे. या केंद्राकरिता सिमेन्स कंपनीसमोरील सुमारे साडेपाच चौरस फुटांचा भूखंड यापूर्वी एमआयडीसीने आरक्षित केला आहे. त्याची आरेखन प्रक्रिया पूर्ण झाली असून, लवकरच बांधकामाच्या निविदा काढण्यात येणार आहेत. बांधकाम सुरू असताना अग्निशमन केंद्राकरिता जरुरी असलेल्या उपकरणांची मागणी केली जाणार असल्याने पुढील दीड वर्षाच्या आता हे केंद्र कार्यान्वित होऊ शकणार आहे.

अंबड औद्योगिक वसाहतीत 2200 च्या आसपास लघु व मध्यम उद्योग आहेत. या उद्योगांतून जवळपास 30 हजारांवर कामगार काम करीत असतात. गोंदे आणि वाडीवर्‍हे या महानगरालगतच्या औद्योगिक वसाहतींचे अंतरही अंबड औद्योगिक वसाहतीपासून जवळ असल्याने येथे एमआयडीसीने अग्निशमन केंद्र उभारणे नितांत गरजेचे आहे. याबाबत वारंवार उद्योजकीय संघटनांकडून पाठपुरावा केला जात आहे. दरम्यान, पाठपुरावा सुरू असतानाच गेल्या दोन वर्षांत सात कंपन्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या आहेत. यामुळे अग्निशमन केंद्राचा विषय जिल्हा उद्योग मित्रच्या बैठकीत सातत्याने गाजल्यानंतर एमआयडीसीने अंबड औद्योगिक वसाहतीतील सिमेन्स कंपनीसमोरील मोकळी जागा मध्यवर्ती असल्याने आरक्षित करण्यात आली. जागा आरक्षित करून सहा महिने उलटून गेल्यानंतर आता हा प्रस्ताव एमआयडीसीच्या मुख्य कार्यालयातून मार्गी लागत असून, लवकरच बांधकामाच्या निविदा काढल्या जाणार असून, बांधकाम पूर्णत्वासह दीड वर्षात हे केंद्र कार्यान्वित होऊ शकणार आहे.

निविदा काढणार
केंद्राकरिता सिमेन्स कंपनीसमोरील भूखंड आरक्षित केला असून, त्यावर आखणी प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यानंतर आता बांधकामाच्या निविदा काढल्या जाणार असून, साधारणत: दीड वर्षात हे काम पूर्ण होऊन डिसेंबर 2014 पर्यंत अग्निशमन केंद्र पूर्ण होऊ शकेल.
-जयवंत बोरसे, कार्यकारी अधिकारी, एमआयडीसी.

एमआयडीसीचा गलथान कारभार
दोन वर्षांपासून पाठपुरावा करीत असून, सात कंपन्या जळाल्या, त्यांचे नुकसान झाले, एमआयडीसी ते भरून देणार का? महत्त्वाचे म्हणजे सहा महिन्यांपासून आरक्षित जागेची मोजणीच होते. यातून एमआयडीसीने अजून दीड वर्ष लागणार असे म्हणणे म्हणजे गलथान कारभार समोर येतो. -ज्ञानेश्वर गोपाळे, माजी अध्यक्ष, ‘आयमा’