आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौतम बुद्ध, डॉ. आंबेडकरगीते आता ब्रेल लिपीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील गीतांचे वाचन करून त्यांचे सादरीकरण करणे अंध बांधवांनाही शक्य व्हावे म्हणून ब्रेल लिपीच्या माध्यमातून समाजातील या वर्गापर्यंत ती नेण्याचा देशभरातील पहिलाच प्रयोग लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान आणि ब्लाइंड वेल्फेअर असोसिएशनच्या विद्यमाने करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, अंध बांधवांना हा संग्रह विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
ही गीते लिखित स्वरूपात आणि सीडी-डीव्हीडीमध्ये उपलब्ध आहेत. डोळस नागरिक त्यांचा लाभ घेतात. मात्र, अंध बांधवांना त्यांचे केवळ श्रवण करता येते. अंध बांधवांमध्ये कलेचा आविष्कार ठासून भरलेला असल्याचा अनुभव आहे. त्यांच्यातील अनेकांना देवाच्या कृपेने चांगला कंठ मिळाला आहे. केवळ दृष्टीअभावी हे बांधव गीते वाचू शकत नसल्याने त्यांना इतरांवर विसंबून राहावे लागते. दुसर्‍या व्यक्तीच्या तोंडून गीते आत्मसात करून त्यांचे पाठांतर केल्यानंतर त्यांना सादर करता येत होते. अशा बांधवांसाठी प्रा. शरद शेजवळ यांनी ब्रेल लिपीमध्ये लोककवी वामनदादा कर्डक यांच्या निवडक 43 गीतांचा संग्रह केला आहे. अंध बांधवांसाठी हा संग्रह विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या उपक्रमाचे आरोग्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अरुण जामकर, गायक नंदेश उमप यांनी कौतुक केले. संग्रहाची प्रस्तावना शाहीर प्रतापसिंग बोधडे यांची, तर कवी फ. मुं. शिंदे यांचा अभिप्राय आहे. गायक आनंद शिंदे व प्रा. अर्जुन कोकाटे यांनी संदेश दिला आहे. ‘ब्लाइंड वेल्फेअर’चे विकास शेजवळ, रामदास जगधने यांचे विशेष सहकार्य मिळाले आहे.

वामनदादांची गीते प्रेरणास्त्रोत : वामनदादांची गीते, ओव्या आणि कविता आजही लोकप्रिय आहेत. ती स्फूर्तिगीते म्हणूनच गायली जातात. वामनदादांनी पहिले गीत 1943 मध्ये लिहिल्याने 43 गीते ब्रेललिपीत संग्रहित करण्यात आली आहेत. त्यातील ‘भीमज्योत’ ही कविता सर्वांनाच स्फूर्ती देणारी आहे.
वामनदादांची इच्छा झाली पूर्ण...
रात्रशाळेत प्रथम येणार्‍या अंध विद्यार्थ्यांना वामनदादांच्या हस्ते पुरस्कार दिला होता. या विद्यार्थ्यांना गीतांचा लाभ मिळावा, अशी वामनदादांची इच्छा होती. त्यांची ही इच्छा पूर्ण झाली आहे.
- प्रा. शरद शेजवळ, संपादक ब्रेललिपी संग्रह
येथे करा संपर्क
ब्रेल लिपीतील ही पुस्तके विनामूल्य उपलब्ध आहेत. 9822645706, 8958316400 या क्रमांकांवर संपर्क केल्यास अंध बांधवांना ती मिळणार आहेत.