आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्फोटात कुटुंब गमावलेल्या ‘संतना’ला मिळाले अमेरिकन पालक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - गॅस सिलिंडरच्या स्फोटात कुटुंब गमावलेल्या आणि अपंगत्वाचा सामना करणाऱ्या ८ वर्षांच्या संतना या अनाथ बालिकेचे भाग्य शुक्रवारी बदलणार आहे. अमेरिकेतील एक जोडपे तिला दत्तक घेणार आहे. स्नेहांकुर दत्तकविधान केंद्राच्या प्रयत्नातून तिचे नवीन आयुष्य सुरू होणार आहे. संतनाचे आई-वडील रोजगारासाठी बिहारमधून नाशिकमध्ये आले होते. २७ मे २०१४ रोजी गॅस सिलिंडरच्या स्फोटात संतनाचे आई-वडील आणि भाऊ मरण पावले. पाच वर्षांची संतनाही ८० टक्के भाजली, मात्र तिला जीवदान मिळाले. तिच्या सुश्रुषेसोबत शस्त्रक्रियेची जबाबदारी घ्यायला कोणीही तयार नव्हते. ही एक खर्चिक जबाबदारी होती. 

जवळच्या नातेवाइकांनीही तिला सांभाळण्यास पूर्ण नकार दिला होता. नाशिक बर्न सेंटरच्या डॉ. राहुल शिंदे यांनी पुढाकार घेतला. त्यांनी केलेल्या उपचारामुळे संतना  वाचली. त्यांनी संतनाला तीन महिने विनामूल्य सांभाळले. अहमदनगर येथील भाऊ डॉ. राजेंद्र यांना डॉ. राहुल यांनी संतनाबद्दल सांगितले. त्या माध्यमातून संतना स्नेहांकुर या स्नेहालयाच्या दत्तकविधान केंद्रात पोहोचली. दरम्यान, संतनाला पालक मिळविण्यासाठी अडीच वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. पाच महिन्यांपूर्वी अमेरिकेतील श्रीमती जस्मीन डेव्हिडसन या औद्योगिक क्षेत्रातील सल्लागार आणि चिन्मय मिशनच्या शिष्या असलेल्या महिलेने  संतनाची माहिती घेतली. तिला आपल्या कुटुंबात सामील करण्यासाठी दत्तकविधा प्रक्रिया सुरू केली. जस्मीन यांनी आधीच ३ वेगवेगळ्या खंडांमधील अनाथ व बेघर झालेली दाेन मुले आणि एक मुलगी दत्तक घेतलेली आहेत. 

अाज दत्तकविधान साेहळा
संतनाचे दत्तकविधान शुक्रवारी (दि. ३) संध्याकाळी ५ वाजता केडगाव येथील सौ. रूपाली जयकुमार मुनोत बालकल्याण संकुल,  नवल इस्टेट, संदीप हॉटेलशेजारी, नगर-पुणेरोड येथे होणार आहे. उद्योजक जयकुमार आणि दिनेश तसेच त्यांचे वडील समाजसेवक जीवनलालजी मुनोत (बेलवंडी) यांच्या  परिवाराच्या सहयोगातून केडगाव येथे वंचित-उपेक्षित बालकांसाठी भारतातील सर्वात मोठे आणि सुसज्ज दत्तकविधान केंद्र उभारण्यात येत आहे.

‘दिव्य मराठी’चा पुढाकार, लोकांचाही उत्तम प्रतिसाद 
संतनाला वाचविले पाहिजे यासाठी ‘ दिव्य मराठी’ने ‘नाशिक बर्न्स’साेबत आपली भूमिका पार पाडली. दानशूरांना तिच्या उपचारांसाठी मदतीचे अावाहन केले. त्याला लोकांनी उत्तम प्रतिसाद मिळाला. जाे तिला वाचविण्यास नक्कीच मदतगार ठरला - डॉ. राहुल शिंदे.
 
बातम्या आणखी आहेत...