आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Anti Child Labour Day, Latest News In Divya Marathi

बालकामगारविरोधी दिनीही चिमुकल्यांच्या हाती काम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- इवल्याशा हाताने चहा वाटणारी मुले, वीटभट्टीवर जड विटा उचलणारी, बांधकामाच्या ठिकाणचे बिगारी, गिरणीत धान्य दळणारी मुले गुरुवारीही नेहमीप्रमाणेच काम करताना दिसत होती. बालमजुरीविरोधी दिनाचे हे शहरातील चित्र. सर्वात गंभीर बाब म्हणजे बालमजुरी प्रथा बंद करण्याची ज्यांच्यावर मुख्यत्वे जबाबदारी आहे, त्या सरकारी कार्यालयांबाहेरही सर्रास बालमजूर दिसत होते.
12 जून हा दिवस बालमजुरीविरोधी दिवस म्हणून पाळला जातो. बालमजुरीचे उच्चाटन करून मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात सामील करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा दिवस शहरात पाळला जातो, मात्र बालमजुरांची संख्या कमी होताना दिसत नाही. इतकेच नाही, तर बालमजुरीविरोधी दिनालाही या बालकामगारांना कामापासून सुटी मिळत नाही. गुरुवारी शहरातून फेरफटका मारला असता सर्वत्र बालमजुरांचा वावर रोजच्यासारखाच दिसला. शासकीय कन्या शाळेची संरक्षक भिंत बांधण्यासाठी बाल मजुरांचा वापर करण्यात येत होता. जिल्हाधिकारी कार्यालय, कामगार उपायुक्त कार्यालय यांसह अन्य सरकारी कार्यालयांबाहेरील चहाच्या टपºयांवर सर्रास बालमजूर काम करताना दिसत होते.
अर्थार्जन ठरतो अडथळा
कायद्यातील पळवाटांमुळे बालमजुरी प्रथेचे उच्चाटन होण्यास अडचण येत असल्याचे एका कर्मचाºयाने सांगितले. एखाद्या टपरीवर काम करणारा बालक हा आपला नातेवाईक असल्याचे सांगून तो अर्थार्जनासाठी नाही, तर आपल्याला मदत म्हणून काम करतो, असे संबंधित व्यावसायिकांकडून सांगितले जाते. अर्थार्जनासाठी ज्या बालकाचा उपयोग केला जातो तो बालमजूर असतो, अशी कायदेशीर व्याख्या आहे. परंतु संबंधित व्यावसायिक अर्थार्जन दाखवतच नसल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यास शासकीय यंत्रणेला अडचणी येतात.
या वर्षात 5 जण मुक्तता
31 जानेवारी ते 31 डिसेंबर 2013 मधील धाडसत्रात बालमजूर बाळगणाºया 24 मालकांवर कारवाई करण्यात आली. त्यातून 54 बालकामगारांची मुक्तता करण्यात आली. 2014 मध्ये आजपर्यंत झालेल्या धाडसत्रात 2 मालकांवर कारवाई करण्यात आली असून, 5 बालकामगार मुक्त करण्यात आले असल्याची माहिती सहायक कामगार आयुक्त व्ही. एन. माळी यांनी दिली.