आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टोलविरोधी आंदोलन: महामार्गावर आज मनसेचा चक्काजाम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी टोलविरोधात आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर पक्षाने शहरातील नागरिकांना वेठीस न धरता महामार्गावर चक्काजाम करण्याची रणनीती आखली आहे. पक्षाकडून शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आल्या असून, पोलिसांनीही आंदोलनाची धास्ती घेऊन पदाधिकारी व नगरसेवकांना घरपोच नोटीस पाठवली आहे.


पुणे येथील सभेत राज यांनी टोलविरोधात बुधवारी राज्यभरात आंदोलनाचे आदेश दिले होते. गेल्या वेळी टोलविरोधातील आंदोलनाचा बार फुसका ठरल्याची टीका झाल्यामुळे यंदा मनसेच्या पदाधिकार्‍यांनी ‘राजगड’ येथे बैठक घेऊन रणनीती ठरवली. या वेळी आमदार वसंत गिते, नितीन भोसले, महापौर यतिन वाघ, जिल्हाध्यक्ष सचिन ठाकरे यांच्यासह नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते. पदाधिकारी व नगरसेवकांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांची पथके करून प्रामुख्याने सहा प्रमुख महामार्गांवर आंदोलन होणार आहे. गनिमी काव्याने ठराविक अंतराने आंदोलने केली जाणार आहेत. त्यासाठी मनसेच्या पदाधिकार्‍यांच्या तुकड्याही करण्यात आल्या आहेत. सर्वसामान्यांना त्रास होऊ नये यासाठी महामार्गावर आंदोलन करण्याचा निर्णय झाला असून, आंदोलनादरम्यान शांततेच्या मार्गाने निषेध नोंदवावा, असे आवाहन गिते यांनी बैठकीत केले. दरम्यान, पोलिसांनी मनसेचे आंदोलन हाणून पाडण्यासाठी पुरेपूर तयारी केली आहे. पदाधिकार्‍यांना घरपोच नोटिसा बजावल्या असून, मनसेच्या ‘राजगड’ कार्यालयाजवळील पोलिसांच्या गोपनीय शाखेचे कर्मचारी तळ ठोकून होते.


शहरात पोलिसांचे सशस्त्र संचलन
मनसेच्या टोलविरोधी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी मुंबईनाका, गडकरी चौक, जिल्हा परिषद सिग्नल, राजगड व सीबीएस परिसरात सशस्त्र संचलन केले. बंदोबस्तासाठी तीन पोलिस उपआयुक्त, चार सहायक आयुक्त, 40हून अधिक निरीक्षक, सहायक निरीक्षकांसह दोन हजार कर्मचारी तैनात केले आहेत. सर्व कर्मचार्‍यांच्या साप्ताहिक सुट्या व अर्जित रजा रद्द करण्यात आल्या आहेत. राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या, शीघ्र कृती दलाची तुकडी आणि गृहरक्षक दलाचे जवान बाहेरील जिल्ह्यातून मागविण्यात आले आहेत. महामार्गावरील गरवारे चौक, मुंबईनाका, द्वारका चौक, आडगाव नाका, नांदूरनाका आणि ओढा टोलनाक्यावर विशेष दक्षता घेतली जाणार आहे.


टोलवर पोलिसांसोबत तहसीलदार
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी पूर्ण तयारी केली आहे. जिल्ह्यातील महत्त्वाच्या टोलनाक्यांवर कडेकोट पोलिस बंदोबस्त तर राहणारच असून, त्यावर नियंत्रणासाठी स्वतंत्र तहसीलदार आणि नायब तहसीलदार सकाळपासूनच तेथे उपस्थित राहतील.


ट्रान्सपोर्ट असोसिएशनचा पाठिंबा
नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनतर्फे देण्यात आलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, 12 फेब्रुवारी रोजी मनसेतर्फे करण्यात येणार्‍या टोल बंद आंदोलनाला असोसिएशनचा जाहीर पाठिंबा आहे. पत्रकावर असोसिएशनचे अध्यक्ष अंजु सिंगल, सचिव अवतारसिंग बिरदी, सहसचिव रवींद्र विसपुते यांची स्वाक्षरी आहे.


टोलवरही मनसेचा पहारा
बुधवारी टोलनाक्यांवर मनसेचा पहारा राहणार असून, टोल न भरणार्‍या नागरिकांना सहकार्य करण्यासाठी प्रत्येक टोलनाक्यावर पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे पथकही तैनात असेल.