आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अंत्यसंस्काराचे साहित्य आम्ही देऊ तेवढेच.

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जुने नाशिक - अंत्यसंस्कारासाठी महापालिकेतर्फे मोफत देण्यात येणार्‍या वस्तूंचे प्रमाण किती असावे, याबाबत प्रशासनाचे कोणतेही बंधन ठेकेदारावर नाही. आम्ही देऊ तेवढेच साहित्य संबंधितांनी स्वीकारावे, अशा शब्दात ठेकेदाराच्या कर्मचार्‍यानेच पूर्व विभागाच्या सभापती समिना मेमन यांना सुनावल्याने त्या अवाक झाल्या.
अमरधाममध्ये विविध समस्या असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्यानंतर सभापती मेमन यांनी तेथे भेट दिली. तेथे पसरलेले घाणीचे साम्राज्य पाहून अंत्यसंस्कारासाठीचे साहित्य देणार्‍या ठेकेदाराकडे त्यांनी विचारणा केली. अंत्यसंस्कारासाठी महापालिकेतर्फे मोफत दिले जाणारे सरपण व रॉकेल कमी प्रमाणात का दिले जाते, असा प्रश्न त्यांनी करताच या वस्तूंविषयीचे मोजमाप महापालिकेने दिलेले नाही, असे स्पष्ट करून रॉकेल आम्ही 40 रुपये लिटर या भावाने घेत असल्याने ते आमच्या र्मजीनुसार देऊ, असे ठेकेदाराच्या कर्मचार्‍याने सुनावले. त्यावर काय बोलावे, असा प्रश्न सभापतींना पडला.
परंतु तक्रारकर्तेही बरोबरच असल्याने याबाबत वरिष्ठांकडे तक्रार मांडण्याचे आश्वासन देऊन सभापतींनी काढता पाय घेतला. तत्पूर्वी पी. डी. पाटील या अधिकार्‍यास तेथील समस्यांबाबत वेगवेगळ्या सूचना त्यांनी केल्या. मागील अनेक दिवसांपासून ठेकेदार व कर्मचार्‍यांच्या वागणुकीबाबत नागरिकांच्या सातत्याने तक्रारी येत आहेत. याच पार्श्वभूमीवर मेमन यांनी अमरधामची पाहणी केली. परंतु कर्मचार्‍यांच्या अरेरावीमुळे त्या अवाक् झाल्या असून, या प्रकरणाची गंभीर दखल घेतली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
लवकरच सुधारणा केली जाईल - अमरधाममधील दुरवस्थेबाबत नागरिकांच्या तक्रारी होत्या. येथील समस्यांची दखल घेतली असून लवकरच सुधारणा करण्यात येईल. समिना मेमन, सभापती, पूर्व विभाग

कोणतेही मानधन मिळत नाही - यात आमचा काहीही दोष नाही. आम्हाला मनपाकडून कोणतेही मानधन मिळत नाही. रॉकेल तर काळ्या बाजारातून आणावे लागते त्यामुळे माणूस पाहून लाकडे व रॉकेल दिले जाते. आम्हाला याचा फटका बसत असल्याने आम्हाला नागरिकांना स्वस्तात सुविधा देणे जमत नाही. राजू गायकवाड, ठेकेदाराचा कर्मचारी.