आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विखरणीच्या अ‍ॅपल बोरांची गुजरातवरही जादू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - बोरांचे नुसते नाव ऐकले तरी तोंडाला पाणी सुटते. आता थेट सफरचंदाच्या आकाराचे रसाळ बोर बाजारात आले असून, ‘अ‍ॅपल बोर’ नावाने ओळखल्या जाणार्‍या या फळाची 60 रुपये किलोप्रमाणे विक्री होत आहे. येवला तालुक्यातील विखरणी येथील विठ्ठल शेलार यांनी बोराची शेती केली असून, या अँपल बोरांना राज्यातून तर मागणी आहेच, शिवाय सध्या गुजरातमधून रोज दीड क्विंटलपर्यंत मागणी आहे.

बहुतांश शेतकरी आता गहू, कांदे, बाजरी, कापूस या पारंपरिक पिकांपेक्षा नवीन पिकांना प्राधान्य देत आहेत. शेलार यांनी बोराची नवीन जात म्हणून अ‍ॅपल बोरांची लागवड केली; मात्र बाजारात येणार्‍या मोठय़ा आकाराच्या बोरांप्रमाणे यालाही चव राहाणार नाही म्हणून इतरांनी त्याला फारसा प्रतिसाद दिला नाही. परंतु, हे फळ मधाळ असल्याने सध्या त्याची खूप चर्चा आहे. गुजरातमधील सुरत, बडोदा तसेच अहमदनगर येथून या बोरांना प्रमाणात मागणी आहे.

असे पडले अ‍ॅपलबोर नाव
या बोरांचा आकार सफरचंदासारखा असून, दिसायलाही ते तसेच असल्याने त्याला अँपल बोर म्हणूनच ओळखले जाते. एका बोराचे वजन हे जास्तीत-जास्त 250 ते 300 ग्रॅमपर्यंत जाते. देठ नाजूक असल्याने 200 ग्रॅम वजनाच्या बोरांची तोड करावी लागते. रसाळ चवीमुळे या बोरांपासून शरीराला पाणीही मिळते.

आठ महिने लागतात
छाटणी केल्यानंतर सात ते आठ महिन्यात ही बोरे परिपक्व होतात. पहिल्या वर्षी प्रत्येक झाडाला कि मान 40 ते 50 किलो बोरांचे उत्पादन होते. दुसर्‍या वर्षी प्रत्येक झाडाला 100 ते 120 किलो बोरांचे उत्पादन होते. 40 रुपये किलोने ठोक विक्री तर किरकोळ बाजारात 60 ते 70 रुपये किलोने याला मागणी असते.

रोज दोन क्विंटलपर्यंत तोड
रोज दोन क्विंटल बोरांची तोड होत असून, दिवसेंदिवस मागणी वाढत आहे. कृषी विभागानेही याची दखल घेतली असून, अनेक अधिकारी पाहणी करण्यासाठी येत आहेत. विठ्ठल शेलार, बोराचे उत्पादक

मूळ फळ थायलंडचे
थायलंड येथील हे मूळ फळ आहे. देशात पश्चिम बंगालमध्ये याचे प्रथम उत्पादन घेतले गेले. त्यानंतर विखरणीच्या शेलार यांनी त्याचे राज्यात उत्पादन घेतले. विषम हवामानातही हे फळ चांगले येते.