आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशाेत्सव मंडळांत सातशेहून अधिक अवयवदान अर्ज, शासकीय माेहिमेला मंडळांनी दिले बळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक, नाशिकराेड, इंदिरानगर - शासकीयस्तरावरून सुरू असलेल्या अवयवदानाच्या माेहिमेत काही गणेशाेत्सव मंडळांनी पुढाकार घेतल्याने अातापर्यंत या मंडळांच्या माध्यमातूनच तब्बल सातशेहून अधिक नागरिकांनी अवयवदानाचे अर्ज स्वयंस्फूर्तीने भरून दिले अाहेत. यात नाशिक शहर, इंदिरानगर, नाशिकराेडसह विविध भागातील गणेशाेत्सव मंडळांचा समावेश अाहे. 
 
मृत्यूनंतर आपल्या अवयवामुळे एखाद्याचे प्राण वाचत असतील तर ते सर्वात मोठे पुण्य मानले जाते. मात्र, पूर्वी अवयवदानाला फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. पण, अाता सर्व स्तरावरून सुरू असलेल्या जनप्रबाेधनामुळे ‘मरावे परी अवयवरूपी उरावे’ या उक्तीनुसार नागरिक अवयवदान करण्यासाठी पुढे येत अाहेत. जुने नाशिकच्या प्रख्यात साक्षी गणेश मंदिराबाहेरच लावण्यात अालेल्या अवयवदानाच्या अावाहनाला पहिल्या दिवसापासूनच नागरिकांनी प्रतिसाद दिला अाहे. ४० हून अधिकअर्ज भद्रकाली मित्रमंडळाच्या माध्यमातून झाले अाहेत. त्याशिवाय, रविवार कारंजा गणेशाेत्सव मंडळातही ५० हून अधिक अर्ज गेल्या पाच दिवसांमध्ये अाले असल्याची माहिती राेहन पवार यांनी दिली. एकूण, शहराच्या मध्यवर्ती भागातच शंभरहून अधिक नागरिकांनी अवयवदान माेहिमेचे अर्ज भरून दिले अाहेत. त्याशिवाय पंचवटी, काॅलेजराेड, गंगापूरराेड भागातील गणेशाेत्सव मंडळांतही तीनशेहून अधिक अवयवदानाचे अर्ज स्वयंस्फूर्तीने भरण्यात अाले अाहेत. 
 
इंदिरानगरला शंभर अर्ज 
प्रभागक्रमांक ३० मधील श्री प्रतिष्ठानच्या शंभर कार्यकर्त्यांनी अवयवदानाचा संकल्प गणेशाला साक्षी ठेवून केला. गणेश स्थापनेच्या दिवशीच ॲड. श्याम बडोदे यांच्या अावाहनानंतर शंभर अर्ज उद्योजक सुनील फरांदे यांच्या उपस्थितीत मानवता हेल्प फाउंडेशनचे रवींद्र दुसाने, शशिकांत बोरसे, सतीश लोहारकर, साधना दुसाने आणि मोनाली बोरसे यांच्याकडे देण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष जयंत टक्के, उदय बडोदे, संदीप खोडे, राहुल कासार, निखील भदाणे, अनिकेत जपे, अजय बडोदे, स्वप्नील भदाणे, विशाल बडोदे, अनिकेत पवार यांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला. 

भागवत कुटुंबातील १३ जणांचे अर्ज 
नाशिकरोड येथील बाजीराव भागवत यांच्यासह कुटुंबातील १३ व्यक्तींनी स्वखुशीने अवयवदानासाठी अर्ज भरले अाहेत. बाजीराव भागवत यांनी प्रथम अर्ज भरल्यानंतर त्यांच्या मुलानेही अवयवदानाची इच्छा व्यक्त केली. नंतर घरातील सर्वांनी अर्ज भरले. भागवत यांचा अादर्श घेत त्यांचे नातलगही अवयवदानासाठी अर्ज भरू लागले आहेत.

नाशिकराेडला २५० हून अधिक अर्ज  
नाशिकराेड, जेलराेड परिसरातील सात मंडळांमध्ये अवयवदानाचे अर्ज भरण्यासाठी अावाहन करण्यात अाले हाेते. बुधवारपर्यंत सुमारे २५० हून अधिक अर्ज नागरिकांनी स्वयंप्रेरणेने भरून दिले अाहेत. जेलराेडच्या दैवत प्रतिष्ठानने सुमारे ५० अवयवदानाचे अर्ज भरले अाहेत. तर अार्टिलरी सेंटर राेडवरील म्हसाेबा मित्रमंडळाने त्यांच्या अासपासच्या परिसरातील ४६ नागरिकांचे अवयवदानाचे अर्ज भरले अाहेत. त्याशिवाय नाशिकराेड, देवळाली कॅम्प, भगूरच्या मंडळांनीही अवयवदान माेहिमेत पुढाकार घेतला अाहे. 
बातम्या आणखी आहेत...